पाकने २0 वर्षांनंतर कांगारूंना नमविले
By admin | Published: November 4, 2014 01:36 AM2014-11-04T01:36:21+5:302014-11-04T01:36:21+5:30
याआधी पाकिस्तानने १९९४ मध्ये आपल्याच भूमीवर ३ कसोटी सामन्यांची मालिका १-0 अशी जिंकली होती.
अबुधाबी : कर्णधार मिस्बाह उल हकची विक्रमी शतकी खेळी आणि त्यानंतर जुल्फिकार बाबरची भेदक गोलंदाजी (५ बळी) या जोरावर पाकिस्तानने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ३५६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्याचप्रमाणे २0 वर्षांनंतर प्रथमच त्यांनी या संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. याआधी पाकिस्तानने १९९४ मध्ये आपल्याच भूमीवर ३ कसोटी सामन्यांची मालिका १-0 अशी जिंकली होती.
दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने आॅस्ट्रेलियासमोर ६0३ धावांचे कठीण असे लक्ष्य ठेवले होते; प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाचा संघ पाचव्या व अखेरच्या दिवशी ८८.३ षटकांत २४६ धावांत गारद झाला. त्याचबरोबर पाकिस्तानने मालिकेत २-0 असा आॅस्ट्रेलियाचा सफाया केला. पाकिस्तानने पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाचा २२१ धावांनी पराभव केला होता.
आॅस्ट्रेलियातर्फे फक्त स्टीव्हन स्मिथने एकाकी झुंज देताना ९७ धावांची खेळी करताना पाकिस्तानला विजयासाठी प्रतीक्षा करायला लावली. स्मिथशिवाय डेव्हिड वॉर्नरने ५८ धावा केल्या, तर ७ फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजांसमोर दुहेरी आकडी धावसंख्यादेखील पार करू शकले नाहीत.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाकिस्तानकडून जुल्फिकार बाबरने ३२.३ षटकांत १२0 धावा देत सर्वाधिक ५ गडी बाद केले. त्याला यासीर शाहने ४४ धावांत ३ आणि मोहम्मद हाफीजने ३८ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली.आॅस्ट्रेलियाने कालच्या ४ बाद १४३ या धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. स्मिथने नाबाद ३८ धावांवरून पुढे खेळताना २0४ चेंडूंत १२ चौकारांसह एकूण ९७ धावा करीत आॅस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवल्या; परंतु पाकिस्तानच्या यासीर शाहने स्मिथला पायचित करीत २३८ या धावसंख्येवर सहाव्या फलंदाजाच्या रूपाने तंबूत धाडले. मिचेल मार्शने ४७ धावांचे योगदान देताना स्मिथबरोबर पाचव्या गड्यासाठी १0७ धावांची भागीदारी केली; परंतु अन्य फलंदाजांना पाकिस्तानी गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली. आॅस्ट्रेलियाने त्यांचे अखेरचे ५ फलंदाज ४३ चेंडूंत आणि ८ धावांत गमावले. (वृत्तसंस्था)