३६ साल बाद...

By admin | Published: July 19, 2016 06:24 AM2016-07-19T06:24:06+5:302016-07-19T17:36:01+5:30

रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे ‘जम्बो’ पथक सहभागी होत आहे. हे पथक जम्बो होण्यास हातभार लागला तो महिला हॉकी संघाचा.

After 36 years ... | ३६ साल बाद...

३६ साल बाद...

Next

- विश्वास चरणकर/कोल्हापूर
रियो आॅलिम्पिकमध्ये भारताचे ‘जम्बो’ पथक सहभागी होत आहे. हे पथक जम्बो होण्यास हातभार लागला तो महिला हॉकी संघाचा. कारण ३६ वर्षांनंतर भारतीय महिला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. या १६ खेळाडूंमुळे भारताचे पथक जम्बो झाले आहे. ३६ वर्षांनंतर मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी आता या १६ खेळाडूंवर पडली आहे.
भारतीय महिला संघ १९८0 साली रशियात झालेल्या आॅलिम्पिकमध्ये खेळला होता. त्यानंतर भारताला आॅलिम्पिक पात्रता मिळविता आलेली नाही. भारतीय महिला संघ आॅलिम्पिकमध्ये पुन्हा कधी खेळणार, असा एकच प्रश्न सतावत होता; पण डिफेंडर सुशीला चानूच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न यंदा साकारताना दिसत आहे. नुकत्याच बेल्जियममध्ये झालेल्या विश्व हॉकी लीग सेमिफायनलमध्ये भारताने जपानला हरवून पाचवे स्थान मिळविले. या विजयामुळे भारत २0१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पोहोचला आहे.
१९८0 मध्ये मॉस्को येथे झालेल्या आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ खेळला होता. तेव्हापासून हा संघ आॅलिम्पिकच्या दरवाजावर धडका मारतो आहे; पण ही धडक यंदा यशस्वी झाली. रितूराणीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुलींनी बेल्जियममध्ये झालेल्या विश्व हॉकी लीग सेमिफायनलमध्ये चमकदार कामगिरी करून ही संधी निर्माण केली आहे. यापूर्वी १९८0 ला जेव्हा भारतीय संघ आॅलिम्पिकमध्ये खेळत होता, तेव्हा आजच्या या संघातील एकही खेळाडू जन्मालाही आली नव्हती. विश्व हॉकी लीग सेमिफायनलमध्ये नेदरलँडकडून मोठा पराभव झाल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या आॅलिम्पिक मिशनला धक्का बसला होता.
जपानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी लास्ट चान्स होता. त्यामुळे मुलींनी जीवतोड मेहनत केली. त्यांनी जपानला हरविले आणि पाचवे स्थान मिळविले. या विजयाने देशाला आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून दिले. या संघाचे नेतृत्व रेल्वेकडून खेळणारी मणिपूरची खेळाडू सुशीला चानू करीत आहे. बंगरूळू येथे झालेल्या शिबिरात रितूराणीने गैरवर्तन केल्यामुळे तिला संघातून वगळण्यात आले, त्यामुळे कर्णधारपदाची माळ सुशीलाच्या गळ्यात पडली.

>तिकीट तपासणीसच्या हातात ‘आॅलिम्पिक तिकीट’
आॅलिम्पिकमध्ये खेळावयास मिळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आणि एखाद्या संघाचा कर्णधार म्हणून खेळावयास मिळत असेल तर ‘सोने पे सुहागा’. अशीच काहीशी अनपेक्षित लॉटरी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सुशीला चानू हिला लागली आहे. भारतीय संघाला आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेली रितू राणी गैरवर्तनामुळे आॅलिम्पिक संघातून बाहेर पडली अन् कर्णधारपदाची माळ मणिपूरच्या सुशीला चानूच्या गळ्यात पडली.
सुशीलाने २00३ साली मणिपूर अ‍ॅकॅडमीतून हॉकीचा प्रारंभ केला आणि २00८ साली ती राष्ट्रीय संघात निवडली गेली. आठ वर्षांत शंभराहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या सुशीलाच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला हॉकी संघाने २०१३ साली ज्यु. वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. सुशीलाचा रेल्वे खात्यात ज्यु. तिकीट तपासणीस असा हुद्दा आहे. पण आज तिच्या हातात ‘तिकीट’ आहे. सव्वाशे कोटी जनतेच्या अपेक्षांना ती कशी सामोरे जाते हे लवकरच कळेल.
>भारतीय संघ असा गोलकीपर : सविता, डिफेंडर : सुशीला चानू (कर्णधार), दीपग्रेस एक्का, दीपिका (उपकर्णधार), नमिता टोपो, सुनीता लाकडा, मिडफिल्डर : नवज्योत कौर, मोनिका, निक्की प्रधान, रेणुका यादव, लिलिमा मिंज, फॉरवर्ड : अनुराधा देवी थोकचोम, पूनम राणी, वंदना कटारिया, राणी, प्रीती दुबे, राखीव खेळाडू : नियालूम लाल रुआत फेली (डिफेंडर) आणि रजनी एटीमारपू.

Web Title: After 36 years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.