अखेर 3 पैलवानांची अमित शहांसोबत दीड तास बैठक, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:56 PM2023-06-05T12:56:09+5:302023-06-05T12:57:43+5:30
पैलवानांनी कायदेशीर प्रक्रियेंवर विश्वास ठेवण्याचं आवाहन मंत्र्यांनी दिल्लीतील कुस्तीपटूंना केलं होतं.
नवी दिल्ली - भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी ऑलिंपिकविजेत्या खेळाडूंसह देशातील कुस्तीपटू गेल्या महिनाभरापासून आंदोलनावर बसले आहेत. जंतरमंतरवर पैलवानांसोबत पोलिसांनी केलेली धरपकड पाहिल्यानंतर कुस्तीपटूंच्या पाठिंब्याचा मुद्दा देशभर तापला आहे. तर, सरकारच्यावतीनेही क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि माहिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी भूमिका स्पष्ट केली. आता, पैलवान साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.
पैलवानांनी कायदेशीर प्रक्रियेंवर विश्वास ठेवण्याचं आवाहन मंत्र्यांनी दिल्लीतील कुस्तीपटूंना केलं होतं. मात्र, पैलवाना आपल्या आंदोलनाच्या मुद्यावर ठाम असून हरयाणात शुक्रवारी खाप पंचायतीची बैठक झाली. त्यात, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा आंदोलन करू, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर, आता पैलवान साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही बैठक झाली. या बैठकीत, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता तपास केला जाईल, असे आश्वासन अमित शहांनी कुस्तीपटूंना दिलं आहे.
साक्षी मलिकची आई सुदेश मलिक यांनी अमर उजालाशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. शनिवारी रात्री जवळपास दीड तास ही बैठक झाली. यावेळी, जोशमध्ये नाही तर समजूतदारपणे तुम्ही हा विषय हाताळा, असे आवाहनही अमित शहांनी पैलवानांना केले. तसेच, कुठल्याही खेळाडूंविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही, तर ब्रिजभूषणसिंह यांच्या अटकेसंदर्भात बोलताना, जी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यानुसार सर्वकाही पार पडेल, असेही शहांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोनीपतच्या राठधाना गावात झालेल्या सारोहा खापच्या 12 गावांच्या पंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. या खापमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांना लवकर अटक करून मुलींना लवकर न्याय मिळावा, असे सारोहा खापने म्हटले आहे. मात्र, बजरंग पुनियाने सोनीपत येथील मुंडाला पंयायतीत जाऊन कुठलाही न निर्णय घेण्याचे आवाहन खाप पंचायत प्रमुखांना केलं आहे.