वाद-विवादानंतर आॅलिम्पिकचे बिगुल ५ आॅगस्टपासून वाजणार
By Admin | Published: July 5, 2016 06:43 PM2016-07-05T18:43:53+5:302016-07-05T18:43:53+5:30
गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेले आणि आर्थिक समस्यांचा मारा झेलणाऱ्या रिओ डी जेनेरिओमध्ये ५ आॅगस्टपासून आॅलिम्पिकचा धडाका रंगेल.
ऑनलाइन लोकमत
रिओ डी जेनेरिओ, दि. ५ : गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेले आणि आर्थिक समस्यांचा मारा झेलणाऱ्या रिओ डी जेनेरिओमध्ये ५ आॅगस्टपासून आॅलिम्पिकचा धडाका रंगेल. विशेष म्हणजे यासह हा क्रीडा कुंभमेळा आयोजित करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश म्हणून ब्राझील नवा इतिहासही रचेल.
स्पर्धेसाठी सर्व स्टेडियम सज्ज असून त्यांना आता फिनिशिंग टच दिला जात आहे. ५ ते २१ आॅगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या जागतिक क्रीडा महोत्सवासाठी ब्राझीलमध्ये सुमारे ५ लाखहून अधिक क्रीडाप्रेमींची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. रिओ शहर पुर्णपणे सज्ज असून मला माझ्या शहराचा गर्व आहे,ह्णह्ण असे रिओचे राज्यपाल एडुआर्डो पेस यांनी सांगितले.
खेळाडू आणि पदकांच्याबाबतीत सांगायचे झाल्यास वेगाचा बादशाह उसेन बोल्टपासून विश्वविक्रमी जादुई स्वीमर मायकल फेल्प्स सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंसह १० हजार खेळाडू पदकांच्या शर्यतीत आहेत. एकीकडे जगभरातील खेळाडू आॅलिम्पिकमध्ये स्वत:ची छाप पाडण्यासाठी रिओमध्ये मोठ्या तयारीने येत असताना, दुसरीकडे स्थानिक नागरिकांकडून मात्र या सोहळ्यालाच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रिओ शहरात वाढ होणाऱ्या गुन्हेगारीमुळे शहराची बदनामी होत आहे. शहरात खून प्रकरणही वाढले असून रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. त्यातच सोमवारी रिओ शहराच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर १०० हून अधिक अधिकाऱ्यांनी स्वागत कक्षामध्ये नरकामध्ये तुमचे स्वागत आहेह्ण अशा आशयाचे फलक लावून विरोध केला.
अनुभवी पोलिस अधिकारी अलेक्झेंडर नेतो यांनी सांगितले, आम्ही येथे नागरिकांना आणि जगभरातील पर्यटक व क्रीडाप्रेमींना ब्राझीलची वस्तुस्थिती सांगण्यास आलो आहोत. त्यांना व आम्हाला मुर्ख बनविण्यात आले आहे. येथे सर्वसामन्यांची सुरक्षा व्यवस्थेसारखे काहीही नाही. या सर्व विरोध प्रदर्शनाबरोबरच आर्थिक मंदी आणि झिका वायरस सारखे संकटही स्पर्धा आयोजकांपुढे आ वासून उभे आहेत.
स्पर्धा आयोजनांपुर्वीच रिओ शहरामध्ये अनेक वाद उफाळून आले. रिओच्या रस्त्यांवर एकूण ८५ हजार पोलिस तैनात राहणार असून २०१२ लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. तसेच इस्तांबूल आणि बगदाद येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आॅलिम्पिक स्पर्धेवरही संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.