पराभवानंतर पाकसमर्थकांनी जाळले खेळाडूंचे पुतळे!
By admin | Published: March 22, 2015 01:11 AM2015-03-22T01:11:04+5:302015-03-22T01:11:04+5:30
आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे.
कराची : आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. या चाहत्यांनी देशभरात टीव्ही संचांची मोडतोड केली, शिवाय खेळाडूंचे पुतळेही जाळले.
दारुण पराभवानंतर चाहत्यांनी विरोध दर्शवीत खेळाडूंच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. निराश चाहत्यांनी टीव्ही संच फोडलेच, शिवाय चेंडू-बॅट व क्रिकेटच्या अन्य सामानाचीही होळी केली. पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी मात्र संघाची कामगिरी समाधानकारक झाल्याचे सांगून उपांत्यपूर्व सामन्यातील कामगिरी निराशाजनक झाल्याचे म्हटले आहे. जखमांमुळे काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या झुंजीचीही त्यांनी प्रशंसा केली. पाकच्या माजी खेळाडूंनी या पराभवासाठी कर्णधार मिस्बाह उल हक, मुख्य कोच वकार युनूस आणि पीसीबीला धारेवर धरले. माजी कर्णधार आणि फलंदाज मोहम्मद युसूफ म्हणाला,‘‘इतकी वर्षे कर्णधारपद भूषविल्यानंतरही मिस्बाह संघाबाबत ठोस निर्णय घेऊ शकला नाही, हे दुर्दैव आहे. याचा फटका संघाला बसला. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कुठले खेळाडू हवे, हे कोच व कर्णधाराला माहीत असावे. या संघात राहत अली आणि सोहेल खान यांचा समावेश होता, पण मजेची बाब अशी की दोन्ही खेळाडूंचा संभाव्य ३० जणांमध्ये समावेश नव्हताच.’’
माजी कसोटी कर्णधार आमिर सोहेल याने पाक क्वार्टर फायनलच्या पुढे जाणारच नव्हता, असा दावा केला. तो म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे, तर या संघाने उपांत्यपूर्व सामना खेळला ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल.’’ माजी कर्णधार रशीद लतिफ म्हणाला, ‘व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका संघाला बसला आहे. व्यवस्थापनाने काही मोठ्या चुका केल्या आणि खेळाडू जखमी झाले, त्याचाही विपरीत परिणाम संघावर झाला.’’ (वृत्तसंस्था)
आम्हाला माफ करा!
मी दु:खी आहे. पराभवाबद्दल देशातील जनतेची माफी मागतो. आमच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आम्ही सामना जिंकू शकलो असतो, पण कमी पडलो. पुन्हा उभे राहण्यासाठी चाहत्यांचा पाठिंबा हवा आहे.
- वहाब रियाझ,
पाकचा वेगवान गोलंदाज