पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल

By admin | Published: August 20, 2016 09:44 AM2016-08-20T09:44:16+5:302016-08-20T20:18:01+5:30

रिओ ऑलिम्पिकच्या बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत पराभूत होऊनही सिंधूने खेळाचा मान राखत विजेत्या कॅरोलिनाची खाली पडलेली रॅकेट उचलून योग्य ठिकाणी ठेवली.

After the defeat, you will be proud of what Sindhu did | पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल

पराभवानंतर सिंधूने जे केलं त्यामुळे तुम्हालाही अभिमान वाटेल

Next
- शिवराज यादव / ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. 20 - अतिशय चुरशीच्या आणि क्षणोक्षणी रोमांच उभे करणाऱ्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी. व्ही. सिंधूचा पराभव केला. मात्र पराभव होऊनही तमाम भारतीयांना तिने सुवर्ण आठवणी देत रौप्य मिळवले आणि ‘गोल्डन गर्ल’ बनली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमानही तिने मिळवला. मात्र पराभवानंतरही पी व्ही सिंधूने जे केलं ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल.

अंतिम सामना जिंकल्यानंतर कॅरोलिनाला अश्रू अनावर झाले होते. सामना जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करताना तिने रॅकेट कोर्टवरच ठेवून दिली होती. विजय झाल्यानंतर समोर सुवर्णपदक दिसत असताना कशाचंही भान न राहणं हे साहजिक आहे. पराभव झाल्याने सिंधूही काही वेळ कोर्टवर खाली बसून होती. पण नंतर खेळभावना दाखवत तिने स्वत: जाऊन कॅरोलिनाला मिठी मारत शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर रेफ्रीकडे जात असताना कॅरोलिनाची खाली पडलेली रॅकेट उचलून योग्य ठिकाणी ठेवली. 
वर्ल्ड चॅम्पियनच्या थाटात खेळणारी कॅरोलिना जिंकल्यानंतर सिंधूच्या थेट गळ्यातच पडली अन् सिंधू हारूनही जिंकली होती. तमाम भारतीयांची मनं तिने अगोदरच जिंकली होती, पण तिने खाली पडलेली रॅकेट उचलून आदरही मिळवला. आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला बॅट फेकून देताना कधी पाहिल्याचं आठवतं का ? नाही ना. कारण तो आपल्या खेळाचा आदर करतो आणि नेमकी हीच भावना पी व्ही सिंधूमध्ये पाहायला मिळते. उत्तम खेळाडू असण्याचे सर्व गुण तिच्यात पाहायला मिळतायत, त्यामुळे भविष्यात तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या आव्हानाचा सिंधूने उत्तम प्रतिकार केला. मात्र, तिस-या व निर्णायक गेममध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला आणि सुवर्णपदक मारिनने पटकावले. सिंधूने मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिम्पिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड (अथेन्स २00४), विजयकुमार (लंडन २0१२) आणि मल्ल सुशीलकुमार (लंडन २0१२) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत. तरीही बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिकचे रौप्य पदक पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली.
सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरी, मेरि कोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. पण सिंधूने यापुढे जात रौप्यपदकाची कमाई केली.
 
 
पी व्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली आहे. पी व्ही सिंधूचं वय 21 असून सर्वात तरुण वयात पदक जिंकण्याचा मानही तिने मिळवला आहे.

Web Title: After the defeat, you will be proud of what Sindhu did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.