GST नंतर Live क्रिकेट सामने पाहणे महागणार
By admin | Published: June 30, 2017 12:15 PM2017-06-30T12:15:56+5:302017-06-30T12:34:42+5:30
जीएसटी लागू झाल्यानंतर काही ठिकाणी तुमचे पैसे वाचतील तर, काही ठिकाणी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - जीएसटी लागू झाल्यानंतर काही ठिकाणी तुमचे पैसे वाचतील तर, काही ठिकाणी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. उदहारणार्थ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर तुमचे पैसे वाचतील तर, चैन करताना तुमचा खिसा जास्त रिकामा होईल. चैनीच्या गोष्टीमध्ये आयपीएलचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट आणि मनोरंजनाचा तडका असलेले आयपीएल भारतात लोकप्रिय असून, जीएसटी लागू झाल्यानंतर स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहणे महागणार आहे.
आयपीएलच्या एका तिकिटावर 28 टक्के कर भरावा लागेल. मान्यताप्राप्त क्रीडा संघटना उदहारणार्थ क्रिकेट, हॉकी सामन्यांच्या तिकिटावर 18 टक्के कर द्यावा लागेल. 250 रुपयांच्या आत असलेल्या तिकिटावर जीएसटी लागू होणार नाही. पण प्रत्येक स्टेडियममध्ये या दरात मर्यादीत तिकिटे उपलब्ध असतात. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना यापुढे जास्त पैसे मोजावे लागतील. आधी मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांच्या सर्व क्रीडा सामन्यांवर सरसकट 28 टक्के जीएसटी आकारण्याचे ठरले होते.
आणखी वाचा
पण गुरुवारी झालेल्या बैठकीत हा कर 10 टक्क्यांनी कमी करुन 18 टक्के करण्याता आला. यापूर्वी आयपीएलच्या तिकिटावर सेवा आणि मनोरंजन कर आकारला जात होता. पण आता सर्वच प्रकारच्या क्रीडा सामन्यांमध्ये प्रत्येक तिकिटावर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. क्रीडाप्रेमींसाठी हा एक धक्का आहे.
30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीच्या रुपाने देशात एक नवी कररचना लागू होईल. स्वातंत्र्यानंतरची ही देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असल्याचे बोलले जात आहे. जीएसटीचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होणार असून, वर्षभराच्या अंमलबजावणीनंतरच जीएसटीचे नेमके मुल्यांकन शक्य आहे. व्यापारी, ग्राहक, किंमती आणि सरकारी महसूल सर्वांवरच याचा परिणाम होणार आहे.
जीएसटीसाठीच्या संसदेच्या विशेष अधिवेशनावर काँग्रेसचा बहिष्कार
देशातील करप्रणालीत क्रांतिकारी बदल करणाऱ्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला ऐतिहासिक बनवण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसने जीएसटीच्या उदघाटनासाठी शुक्रवारी मध्यरात्री बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष संयुक्त अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.