Commonwealth Games:नीरज चोप्राच्या दुखापतीनंतर आता रोहित यादव कडून पदकाची आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:53 PM2022-07-30T15:53:31+5:302022-07-30T15:54:54+5:30
इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अनेक भारतीय खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत.
बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अनेक भारतीय खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. स्पर्धेच्या सुरूवातीला भालाफेकपटू नीरज चोप्राच्या रूपात भारताला एक मोठा झटका बसला. पायाला झालेल्या दुखापतीमुळे नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे नीरज चोप्राची कमी विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १० व्या स्थानावर राहिलेला भालाफेकपटू रोहित यादव भरून काढणार का हे पाहण्याजोगे असणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी झालेला रोहित बर्मिंगहॅममध्ये खूप घाम गाळत आहे.
विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान तब्येत ठीक नसल्यामुळे रोहित चांगले प्रदर्शन करू शकला नाही. ७८.७२ मीटर लांब भाला फेकून त्याला १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा एकदा संधी मिळाली असून देशासाठी पदक मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे रोहितने म्हटले आहे. ५ ऑगस्ट २०२२ रोजी रोहित यादव भालाफेकीत कमाल करून इतिहास रचणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहितकडून समस्त भारतीयांना पदकाची आशा
रोहितचा मोठा भाऊ राहुल यादवने सांगितले की, "आम्हा तीन भावंडांमध्ये रोहित दोन नंबरचा असून आम्हाला आणखी एक भाऊ आहे. यावेळी तो नक्कीच पदक जिंकेल आणि देशाचे नाव रोशन करेल." बरेकाचे महाव्यवस्थापक यांनी रोहित राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याच्याकडून संपूर्ण देशाला पदकाची अपेक्षा आहे. रोहित एवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे ही समस्त बरेकातील जनतेसाठी गर्वाची बाब असल्याचे त्यांनी अधिक म्हटले.
दुखापतीमुळे नीरज चोप्राची स्पर्धेतून माघार
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या पूर्वसंध्येलाच भारताला एक मोठा झटका बसला. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या पायाच्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाला. नीरजने या स्पर्धेत सहभागी न झाल्याने एक भावनिक पोस्ट देखील केली होती. त्याला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान दुखापत झाली होती. अलीकडेच पार पडलेल्या या चॅम्पियनशिपममध्ये नीरजने रौप्य पदक पटकावून भारताचा तब्बल १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. तसेच या चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या खात्यात पहिल्यांदाच रौप्य पदक आले आहे.