आॅलिम्पिकनंतर निवृत्त होणार
By admin | Published: September 29, 2015 12:03 AM2015-09-29T00:03:20+5:302015-09-29T00:03:20+5:30
भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोम हिने आपल्या निवृत्तीचे संकेत देताना आगामी रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी शेवटची असून
दार्जिलिंग : भारताची दिग्गज महिला बॉक्सर मेरी कोम हिने आपल्या निवृत्तीचे संकेत देताना आगामी रिओ आॅलिम्पिक माझ्यासाठी शेवटची असून, या स्पर्धेनंतर बॉक्सिंगमधून निवृत्ती घेणार, असे सांगितले. त्याच वेळी यानंतर खेळाडू या नात्याने नाही; मात्र प्रशिक्षक म्हणून बॉक्सिंगशी कायम जोडली जाणार, असेही मेरीने सांगितले.
दार्जिलिंग येथील नेपाळी मुलींच्या शाळेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मेरीने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भविष्यातील वाटचालींविषयी सांगितले. रिओ आॅलिम्पिकनंतर मी निवृत्ती घेणार असून, यानंतर मी माझ्या स्वत:च्या बॉक्सिंग अकादमीमध्ये नवोदितांना प्रशिक्षण देणार असल्याचे पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोम हिने सांगितले. अनेक वर्षांपासून मी स्वत:ला रिंगमध्ये सिद्ध करीत असून, आतापर्यंत मी स्वत:ला रिंगमध्ये सिद्ध करीत आहे, असेही मेरी म्हणाली.
मागील आठवड्यात मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मेरीने ईशान्य भारतीय असल्याने आपल्यावर अनेकदा अन्याय झाल्याचे वक्तव्य केले होते. याविषयी मेरीने फार काही न बोलता स्पष्ट केले की, आॅलिम्पिक प्रवेशासाठी मी माझ्यापरीने पुर्ण तयारी करीत असून मला सरकारकडून योग्य ती मदत मिळत आहे.