कर भरल्यानंतर होळकर स्टेडियमचे टाळे उघडले
By admin | Published: April 1, 2017 01:02 AM2017-04-01T01:02:17+5:302017-04-01T01:02:17+5:30
मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे (एमपीसीए) २९ लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कर आणि अन्य कर भरल्यानंतर या संघटनेच्या
इंदौर : मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे (एमपीसीए) २९ लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कर आणि अन्य कर भरल्यानंतर या संघटनेच्या अधिकाऱ्याचे कार्यालय आणि होळकर स्टेडियमच्या दोन मुख्य द्वारावर लावण्यात आलेले टाळे शुक्रवारी उघडण्यात आले. त्यामुळे या स्टेडियममध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या तीन आयपीएल सामन्यांच्या आयोजनावरील घोंगावत असणारे संकट टळले आहे.
एमपीसीएने संपत्ती कर आणि स्थानिक करासाठीचा २९.१0 लाख रुपयांचा धनादेश महानगरपालिकेला आज दिला. त्यानंतर एमपीसीएच्या प्रशासनिक भवनातील संघटनेचे मुख्य अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि याच परिसरातील होळकर स्टेडियममधील दोन मुख्य द्वारांवर लावण्यात आलेले टाळे काढण्यात आल्याचे महानगरपालिका उपायुक्त प्रतापसिंह सोलंकी यांनी सांगितले. कर न भरल्यामुळे महानगरपालिकेने गुरुवारी, ३0 मार्चला एमपीसीए परिसरात टाळे ठोकले होते.
किंग्ज इलेव्हन पंजाबने इंदौर येथील होळकर स्टेडियम आपले घरचे मैदान बनविले आहे. हा संघ ८, १0 आणि २0 एप्रिल रोजी तीन आयपीएल सामने खेळणार आहे. हे सामने अनुक्रमे रायजिंग पुणे सुपरजाएंट, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध खेळविले जाणार आहेत.