चेंडू लागल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रॉजर्स
By Admin | Published: January 14, 2015 02:23 AM2015-01-14T02:23:09+5:302015-01-14T02:23:09+5:30
भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात रोहित शर्माने टोलवलेला चेंडू डोक्याच्या मागच्या बाजूला लागला होता़
सिडनी : भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात रोहित शर्माने टोलवलेला चेंडू डोक्याच्या मागच्या बाजूला लागला होता़ त्यानंतर माझ्या मनात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार आला होता, असे मत आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ख्रिस रॉजर्स याने व्यक्त केले आहे़
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रॉजर्स शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करीत होता, तेव्हा भारतीय फलंदाज रोहित शर्माने टोलवलेला चेंडू ३७ वर्षीय आॅस्ट्रेलियन खेळाडूच्या हेल्मेटच्या मागच्या बाजूला लागला होता़ याच जागी नोव्हेंबरमध्ये शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत चेंडू लागल्यानंतर आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजचा मृत्यू झाला होता़
या घटनेनंतर रॉजर्सला धक्का बसला होता़ तो पुढे म्हणाला, की फिल ह्यूजसोबत जे झाले ते माझ्यासोबत होऊ शकत होते़ या घटनेमुळे या सामन्यात मी दबावात होतो, त्यामुळे मी निवृत्तीचा विचार करायला लागलो होतो, तसेच याबद्दल सहकाऱ्यांशी चर्चा करण्याचेही ठरविले होते़ विशेष म्हणजे ह्यूजच्या घटनेनंतर संघातील अनेक खेळाडूंनी धास्ती घेतली होती, असेही त्याने सांगितले़
रॉजर्सने भारताविरुद्ध कसोटी मालिकेत सलग ६ अर्धशतके झळकावली़ अशी कामगिरी करणारा तो आॅस्ट्रेलियाचा नववा फलंदाज ठरला़ तो पुढे म्हणाला, की सलामीला फलंदाजी करण्याचा आनंद घेत आहे़ सलामीला खेळताना थोडी
अडचण येते; मात्र एकदा स्थिरावल्यानंतर फलंदाजी करणे सोपे होते़ (वृत्तसंस्था)