सचिनच्या मध्यस्थीनंतर शास्त्री कोचपदासाठी अर्ज करण्यास तयार
By admin | Published: June 28, 2017 05:41 PM2017-06-28T17:41:45+5:302017-06-28T17:41:45+5:30
अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर नवा प्रशिक्षक कोण होणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने हस्तक्षेप केला आहे. सचिनने रवी शास्त्रीशी चर्चा केल्यानंतर रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला तयार झाले आहेत. प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सदस्यानेच थेट शास्त्रींना अर्ज करायला सांगितल्याने शास्त्रींची अनिल कुंबळेंच्या जागी प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर नवा प्रशिक्षक कोण होणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहेत. सध्या लंडनमध्ये असलेल्या रवी शास्त्री यांनी आपण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नसल्याचे आधी म्हटले होते. संघ संचालक म्हणून चांगली कामगिरी केल्यानंतरही आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असा आरोप शास्त्रींनी केला होता. त्यांचा रोख सौरव गांगुलीवर होता. शास्त्री मागच्यावर्षी प्रशिक्षकपदासाठी प्रेझेंटेशन देत असताना गांगुली मध्येच उठून बाहेर गेला होता. शास्त्री पुन्हा एकदा सल्लागार समितीसमोर आपले प्रेझेंटेशन सादर करतील.
सचिन तेंडुलकरही सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत आहे. सचिनने रवी शास्त्री यांना आपल्या भूमिकेवर फेरविचार करण्याची विनंती केली. संघाचा कर्णधार विराट कोहलीचीही प्रशिक्षक म्हणून शास्त्रींना पहिली पसंती आहे. हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले गेले त्यावरुन सध्या बीसीसीआयवर टीका सुरु आहे. प्रशिक्षक निवडण्याच्या तीन सदस्यीय समितीमध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्ही एस लक्ष्मण आणि सौरव गांगुली या तिघांचा समावेश आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मागच्यावर्षी प्रशिक्षक निवडण्यासाठी बैठक झाली त्यावेळी रवी शास्त्री शर्यतीत आघाडीवर होते. पण शेवटच्या क्षणी अनिल कुंबळेंची एंट्री झाली आणि सर्व चित्रच बदलले. तेंडुलकर त्यावेळीही शास्त्रींच्या पाठिशी होता. पण सौरव गांगुलीची कुंबळेच्या नावाला पसंती होती. त्यावेळी लक्ष्मणने आपले मत कुंबळेच्या पारडयात टाकल्याने प्रशिक्षकपदी कुंबळेची निवड झाली. प्रशिक्षकपदी कुंबळेची निवड होण्याआधी रवी शास्त्री संघाचे संचालक होते. त्यांच्या संचालकपदाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती.