Manish Narwal :पदक जिंकताच घरी व्हिडिओ कॉल; आईच्या प्रश्नावर म्हणाला, आता रडवू नकोस!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:03 PM2024-08-30T22:03:58+5:302024-08-30T22:07:21+5:30

नेमबाजी हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, हे त्याने अगदी अल्पावधित सिद्ध करुन दाखवलं आहे. 

After Silver Medal Victory Manish Narwal Shares An Emotional Moment With His Family Over Video Call | Manish Narwal :पदक जिंकताच घरी व्हिडिओ कॉल; आईच्या प्रश्नावर म्हणाला, आता रडवू नकोस!

Manish Narwal :पदक जिंकताच घरी व्हिडिओ कॉल; आईच्या प्रश्नावर म्हणाला, आता रडवू नकोस!

भारताचा पॅरा नेमबाजपटू मनीष नरवाल याने पुरुष गटातील १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात रौप्य पदक जिंकले. मनीषनं अंतिम फेरीत एकूण २३४.९ गुण मिळवत सुवर्ण पदक विजेत्या कोरियाच्या जोंगडू जो याला कडवी टक्कर दिली. एकेकाळी तो आघाडीवर होता. पण काही खराब शॉट्समुळे सुवर्ण वेध घेण्यापासून तो थोडक्यात चुकला.

पोडिअमवरून खाली येताच घरी केला व्हिडिओ कॉल


सलग दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवल्यानंतर तो खूपच भावूक झाला होता. रौप्य पदक गळ्यात अडकवून पोडिअमवरुन खाली उतरल्या उतरल्या त्याने फॅमिली फर्स्ट, असा सीन दाखवून दिला. कुटुंबियांतील मंडळींशी त्याने व्हिडिओ कॉलवर संवाद साधल्याचे पाहायला मिळाले. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) च्या अधिकृत X अकाउंटवरुन मनीषचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

आईचा एकच प्रश्न, ठिकीये असं म्हणत मनीष झाला भावूक

ज्यात तो डोळ्यातील आनंद अश्रूंसह व्हिडिओ कॉलवर कुटुंबियांशी संवाद साधताना पाहायला मिळते. जगाच्या मानाच्या स्पर्धेत देशाच मान अभिमानानं उंचावलेल्या लेकाला त्याच्या आईचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बाळा कसा आहेस? यावर मी ठीक आहे, म्हणत आता रडवू नकोस, असे म्हणत त्याने कॉल संपवल्याचे दिसून येते.

नेमबाजी हा त्याच्या डाव्या हाताचा खेळ

याआधी मनीष नरवाल याने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धाही गाजवली होती. त्यावेळी मिश्र ५० मीटर पिस्तूल एसएच १ प्रकारात त्याने सुवर्ण वेध साधला होता. फरीदाबादच्या मनीष नरवाल याने वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदक जिंकली आहेत. लहानपणापासून उजव्या हाताने तो काहीही करू शकत नव्हता. फुटबॉलचा चाहता असणाऱ्या २२ वर्षीय मनीष नरवाल याने  वयाच्या  १६ व्या वर्षी नेमबाजीला सुरुवात केली. नेमबाजी हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, हे त्याने अगदी अल्पावधित सिद्ध केले आहे. 
 

Web Title: After Silver Medal Victory Manish Narwal Shares An Emotional Moment With His Family Over Video Call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.