सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची व्यथा; कॅन्सरच्या उपचारासाठी दिल्लीत आले अन् कोरोना पॉझिटिव्ह झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 07:42 PM2020-05-31T19:42:39+5:302020-05-31T19:47:46+5:30
डिंगको सिंग यांनी काही दिवसांपूर्वी कॅन्सरवर यशस्वी मात केली.
बँकॉक येथे 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग यांनी काही दिवसांपूर्वी कॅन्सरवर यशस्वी मात केली. पण, आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 41 वर्षीय डिंगको मागील महिन्यात कॅन्सरच्या उपचारासाठी नवी दिल्ली येथे आले होते. त्यांना विमानानं येथे आणलं गेलं होतं, उपचार घेऊन ते मणिपूर येथे परतले. नवी दिल्ली सोडताना त्यांचा वैद्यकिय अहवाल नेगेटिव्ह होता, पण आता मणिपूरमध्ये त्यांचा तोच अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे, सुत्रांनी पीटीआयला सांगितले.
Asian Games gold medal-winning former boxer Dingko Singh has tested positive for COVID-19: source
— Press Trust of India (@PTI_News) May 31, 2020
डिंगकोला अर्जुन आणि पद्म श्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. 1998च्या आशियाई स्पर्धेत डिंगकोनं 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. 1998साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघानं 7 सुवर्ण, 11 रौप्य आणि 17 कांस्यपदकांची कमाई केली. या सात खेळाडूंमध्ये बॉक्सिंगमध्ये एकमेव सुवर्णपदक जिंकणारा डिंगको सिंग हे आहेत. प्रदीर्घ काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. लॉकडाऊनमुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीला येताही येत नव्हतं. पण, त्यांची प्रकृती बिघडली आणि 25 एप्रिलला त्यांना विमानानं दिल्लीत आणलं गेलं.