पदक जिंकल्यानंतर महिला पहिलवानाने कोचलाच उचलून आपटले
By admin | Published: August 21, 2016 08:31 PM2016-08-21T20:31:04+5:302016-08-21T20:31:04+5:30
खासकरून खेळात विजय नोंदविल्यानंतर खेळाडूंना आपापल्या अंदाजात जल्लोष करताना आपण पाहिले आहे़
ऑनलाइन लोकमत
रिओ डि जेनेरिओ, दि. 21 - खासकरून खेळात विजय नोंदविल्यानंतर खेळाडूंना आपापल्या अंदाजात जल्लोष करताना आपण पाहिले आहे़ मात्र रिओ आॅलिम्पिकदरम्यान एक अनोखी घटना पाहावयास मिळाली़ जपानची एक महिला पहिलवान रिसाको कवाई हिने सुवर्णपदक जिंकल्यानंतर आपल्या कोचला दोन वेळा उचलून आपटले आणि आपल्या शैलीत विजयी जल्लोष केला़ २१ वर्षीय कवाईने कुस्तीच्या फ्री स्टाईलमध्ये ६३ किलो वजनीगटात अंतिम लढतीत युरोपियन चॅम्पियन बेलारूसच्या मारिया मामाशूकचा ३-० ने पराभव करीत रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आपल्या नावावर कोरले़ रिओ आॅलिम्पिक कुस्ती स्पर्धेतील जपानचे हे चौथे सुवर्णपदक आहे़ या विजयानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता़ या विजयानंतर तेव्हा तिचे कोच काजुहितो सकाई तिच्याजवळ आले तेव्हा त्यांना मिठी मारण्याऐवजी कवाईने त्यांना तेथेच मॅटवर एकानंतर एक असे दोन वेळा उचलून आपटले़ मात्र दोन वेळा आपटल्यानंतरही तिने कोचला आपल्या खांद्यावर घेतले आणि चारही दिशेने चक्कर मारून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला़ तिच्या या अंदाजाचे व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल झाले आहे आणि जबरदस्त हिटही झालेले आहे़