पुन्हा ‘बिनधास्त’ युवी, धोनी बघायला मिळेल
By admin | Published: January 10, 2017 01:51 AM2017-01-10T01:51:55+5:302017-01-10T01:51:55+5:30
भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पर्याय ठरलेल्या युवराज सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पर्याय ठरलेल्या युवराज सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. धोनी आता जुन्या दिवसांची आठवण ताजी करीत पुन्हा बेदरकार वृत्तीने क्रिकेट खेळताना दिसेल, असा विश्वास युवराजने व्यक्त केला.
युवराज म्हणाला, ‘आम्ही जसे सुरुवातीला खेळत होतो ते दिवस पुन्हा येतील. मी त्याच्या तुलनेत पूर्वीच सुरुवात केली होती. युवराजने २००० मध्ये, तर धोनीने २००४ मध्ये पदार्पण केले होते, पण आम्ही सोबत खेळत असताना बेदरकारपणे खेळत होतो. आम्ही आगामी मालिकेत याच पद्धतीने खेळू शकतो.’
धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वकप विजेत्या संघाचा (२00७ व २०११) महत्त्वाचा खेळाडू ठरलेल्या युवराजने एक खेळाडू व कर्णधार म्हणून धोनीच्या योगदानाची प्रशंसा केली.
युवराज म्हणाला, ‘आमच्या संघाने अव्वल स्थान पटकाविले. दोनदा विश्वविजेतेपद पटकाविणे, ही कामगिरी प्रशंसनीय आहे. किती कर्णधारांनी अशी कामगिरी केली, याची मला नक्की माहिती नाही. धोनी शांतचित्त व अनुभवी कर्णधार होता.’
कर्णधारपद सोडण्याचा धोनीचा निर्णय योग्यच आहे, असे सांगून युवराज म्हणाला ‘२०१९च्या विश्वकप स्पर्धेसाठी संघ तयार करण्यासाठी युवा खेळाडूने नेतृत्व करणे आवश्यक आहे, असा विचार त्याच्या मनात आला असावा. त्यासाठी त्याने विराटच्या नावाचा विचार केला असावा. ’
संघात पाचव्यांदा पुनरागमन करीत असलेल्या युवराजच्या मते, विराट कोहली स्वत:च्या कामगिरीद्वारे अन्य खेळाडूंना प्रेरित करू शकतो.
विराटचा विचार करता मी त्याला युवा खेळाडूपासून अनुभवी खेळाडू होताना बघितले आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. कामगिरीच्या जोरावर तो चांगला कर्णधार ठरला आहे. विराटला संघाकडून प्रत्येकवेळी अनुकूल निकाल अपेक्षित असतो. एका चांगल्या कर्णधाराचे ते लक्षण आहे. त्याच्या कामगिरीत प्रत्येक वर्षी सुधारणा होत आहे. त्याने कामगिरी सुधारण्यासाठी लक्ष्य निश्चित केलेले असावे. सुरुवातीला तो खोऱ्याने धावा वसूल करीत होता आणि शतके झळकावीत होता. यंदा त्याने द्विशतके झळकाविण्यास सुरुवात केली आहे. विराट वगळता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कुणाची सरासरी ५० पेक्षा अधिक आहे, याची मला कल्पना नाही. भविष्यातही विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरेल आणि भारतीय क्रिकेटची आगेकूच सुरू राहील, अशी आशा आहे. - युवराज सिंग