पुन्हा पराभवाची नामुष्की

By admin | Published: December 20, 2014 10:33 PM2014-12-20T22:33:04+5:302014-12-20T22:33:04+5:30

भारतीय फलंदाजांच्या उणिवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताच आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामनादेखील चार दिवसांत गमविण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली.

Again the defeat of defeat | पुन्हा पराभवाची नामुष्की

पुन्हा पराभवाची नामुष्की

Next

दुसरी कसोटी : आॅस्ट्रेलियाची भारतावर चार गड्यांनी मात, मालिकेत २-०ने आघाडी
ब्रिस्बेन : उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांच्या उणिवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताच आॅस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामनादेखील चार दिवसांत गमविण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. यजमान संघाने आज, शनिवारी चार गड्यांनी हा सामना जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने निर्णायक आघाडी संपादन केली.
दिवसाचा प्रारंभ १ बाद ७१ वरून करणाऱ्या भारताचा दुसरा डाव २२४ धावांत संपला. सकाळी केवळ १६ धावांत चार गडी बाद झाले. सलामीचा फलंदाज शिखर धवन जखमी झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात आला. त्याने झुंझार ८१ धावा केल्या. विजयासाठी हव्या असलेल्या १२८ धावांचा पाठलाग करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने सहा गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा करीत सामना जिंकला. कोहली (१) हा अपयशी ठरताच मिशेल जॉन्सनने भेदक मारा करीत चार गडी बाद केले. हेजलवूड, स्टार्क आणि नाथन लियॉन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत त्याला साथ दिली. धवन आणि उमेश यादव यांनी आठव्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली नसती तर ‘टीम इंडिया’ला शंभर धावांचे आव्हान देणे अवघड झाले असते.
उभय संघांदरम्यान तिसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबोर्न येथे खेळली जाईल. भारताकडे या पराभवाचे कुठलेही कारण नाही. पंचांचे निर्णय मात्र संघाच्या विरोधात गेले. रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांना पंचांनी झेलबाद दिले, पण टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला घासून गेला नाही, हे स्पष्ट होत होते. जॉन्सनने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने ११ चेंडूंवर दहा धावा देत तिघांना बाद केले. अश्विन आणि पुजारा यांनी पडझड थोपवित सहाव्या गड्यासाठी ३० धावांची भागीदारी केली, तर उमेश यादवने प्रत्येकी दोन चौकार आणि दोन षटकारांसह ३० धावांचे योगदान देत २०० चा पल्ला गाठून दिला. जॉन्सनने यादवला यष्टीरक्षक हॅडिनकडे झेल देण्यास भाग पाडून भारताचा डाव संपुष्टात आणला. (वृत्तसंस्था)

जॉन्सनवर शेरेबाजीचा भारताचा विचार योग्य नव्हता : स्मिथ
ब्रिस्बेन : भारताच्या पराभवास जबाबदार ठरलेला आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याच्यावर शेरेबाजी करण्याचा भारतीय खेळाडूंचा विचार योग्य नव्हता, असे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने विजयानंतर सांगितले.
जॉन्सनमुळे आमच्या विजयाची संधी निर्माण झाल्याचे सांगून स्मिथ म्हणाला, ‘वेगवाग गोलंदाजांनी सुरेख मारा केला. मिशेल जॉन्सनने संपूर्ण सामन्यादरम्यान वर्चस्व गाजविले. मिशेलने पहिल्या डावात धावा देखील काढल्या आणि नंतर जो मारा केला त्यामुळे भारतीयांनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न करुन पाहिला, पण अशी शेरेबाजी करणे भारतीय खेळाडूंना महागात पडू शकते.’

सध्याच्या मालिकेत जे निर्णय शंकास्पद होते त्याचा लाभ आम्हाला मिळताना दिसत नाही. डीआरएस असते तरीही भारताला त्याचा लाभ झाला नसता. आम्ही अनेकदा चुकीच्या निर्णयाचे बळी ठरलो. डीआरएसचा वापर योग्य निर्णयासाठी व्हायला हवा. पंचांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी डीआरएसचा वापर होत आहे. अनेक निर्णयांचा आम्हाला फटका बसला आहे. या मालिकेत अम्पायरिंगचा स्तर आणखी चांगला होऊ शकतो. - महेंद्रसिंग धोनी

खेळाडूंमध्ये मतभेद : महेंद्रसिंग धोनी
दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सकाळी फलंदाजीला जखमी शिखर धवन जाईल की विराट कोहली यावरून ‘टीम इंडिया’मध्ये मतभेद झाल्याची कबुली कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने दिली. संवाद नसल्यामुळे हे मतभेद झाले. कोहली खेळायला गेला. भारतीय फलंदाजी कोसळताच आॅस्ट्रेलियाकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली, असे धोनीने सांगितले. कालचा नाबाद सलामीवीर धवन सरावादरम्यान नेट्समध्ये जखमी झाला होता. आज खेळ सुरू झाला तेव्हा त्याने खेळायला जाण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. भारताने कोहलीला पाठवण्याचा निर्णय खेळ सुरू होण्यास सात मिनिटांचा अवधी असताना घेतला. पराभवानंतर धोनीने स्वत: कबुली दिली की परिस्थिती हाताळण्यात आम्ही अपयशी ठरलो.’ तो म्हणाला, ‘शिखर खेळण्यास सज्ज होईल असे वाटले होते, पण त्याला त्रास जाणवत असल्याने कोहलीला पाठविण्याचा निर्णय ऐनवेळी घ्यावा लागला. सामना गमविण्यामागील कारण मात्र धोनी सांगू शकला नाही. त्याने प्रतिस्पर्धी संघाचे कौतुक केले.
सलग दोन सामने गमविल्यानंतरही संघाच्या कामगिरीवर मी आनंदी असल्याचे धोनीने सांगितले. गोलंदाजांचे कौतुक करीत धोनी म्हणाला, ‘आमच्यात काही उणिवा आहेत, त्या दूर केल्या जातील. माझा संघ प्रतिभावान खेळाडूंचा संघ आहे आणि त्यांच्यात मोठा आत्मविश्वास असल्याने आम्ही ट्रॅकवर नक्की येऊ.’

सराव पिचबद्दल फक्त भारताचीच तक्रार : क्यूरेटर
सराव सुविधांबद्दल आणि खेळपट्टीबाबत भारताने तक्रार केली असली तरी अन्य कुण्या संघांकडून कधीही तक्रारीचा सूर निघाला नाही, असे गाबा स्टेडियमच्या क्यूरेटरचे मत आहे. नेट्स सरावासाठी येथे उत्तम विकेट्स असल्याचे त्याने ठासून सांगितले. क्यूरेटर केव्हिन मिशेल म्हणाला, बीसीसीआयने खेळपट्टीवर भेगा असल्याची आणि त्यांचे दोन खेळाडू खेळपट्टीमुळे जखमी झाल्याची तक्रार केली. पण सरावाच्या या खेळपट्ट्या सामन्यासाठी असलेल्या खेळपट्ट्यांसारख्याच चांगल्या दर्जाच्या आहेत.’ आमच्या कुठल्याही खेळाडूला खेळपट्टीबद्दल तक्रार नाही. भारताने बिग बॅश सामन्यांसारख्या खेळपट्ट्या मागितल्या होत्या, पण त्या आता तयार केल्या जाऊ शकत नाहीत. २३ डिसेंबरपासून आयोजित सरावादरम्यान बिग बाशसारख्या खेळपट्ट्या उपलब्ध होऊ शकतील, असे मिशेलने सांगितले.

शाकाहारी भोजनासाठी
इशांत, रैनाची वणवण
वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याला शाकाहारी भोजन न मिळाल्यामुळे उपहाराच्यावेळी तो नाराज होऊन स्टेडियमबाहेर निघून गेला होता. आॅस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून पुरविण्यात येणाऱ्या भोजनावर भारतीय संघ नाराज आहे. दोन्ही सराव सामन्यांवेळी भारतीय खेळाडूंनी आपल्या व्यवस्थापनाला याबाबत तक्रार केली. फिलिप ह्युुजच्या मृत्युमुळे देशात सर्वत्र शोक असलेने भारतीयांनी आपली तक्रार सार्वजनिक केली नव्हती.
अ‍ॅडिलेड कसोटीदरम्यान मात्र भारतीय शेफ असल्याने भारतीयांना भारतीय भोजन उपलब्ध होऊ शकले. ब्रिस्बेनमध्ये मात्र भोजन खराब होते. खेळाडू आणि मीडिया रूममध्ये जेवण करणारे निराश झाले. इशांत आणि सुरेश रैना यांनी याबाबत तक्रार केली. हे दोघे तसेच रवी शास्त्री बाहेर गेले तेव्हा आयसीसी व एसीएसयूचे कर्मचारी त्यांच्यासोबत होते. ही मंडळी स्टेडियममध्ये परतली तेव्हा जेवणाचे पदार्थ आणि शीतपेयांच्या बाटल्या आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला. दोन्ही खेळाडूंनी स्टेडियमबाहेरच जेवण घेतले व ड्रेसिंग रूममध्ये परतले. सामन्यादरम्यान एका खेळाडूला जेवणासाठी बाहेर जावे लागले, यावर एसीएसयू पथकाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सराव सुविधांवर
भारतीय संघ नाराज
क्विन्सलॅन्ड क्रिकेट संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या सरावाच्या सोयींवर भारतीय संघ व्यवस्थापनाने तीव्र नाराजी व्यक्त केली. खराब खेळपट्ट्यांमुळे शिखर धवन आणि विराट कोहली हे जखमी झाले आहेत. हे दोन्ही फलंदाज एकाच गोलंदाजाच्या चेंडूवर जखमी झाले. या गोलंदाजाचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. भारताने गेल्या दोन दिवसांत दोनदा सरावासाठी नवी खेळपट्टी मागितली, मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. भारताला जी खेळपट्टी देण्यात आली, ती भेगा गेलेली होती. याशिवाय जिम नसल्यामुळे भारतीय खेळाडू सराव आटोपल्यानंतर व्यायाम करू शकले नाहीत. समालोचक असलेला शेन वॉर्न याने मात्र भारतीय व्यवस्थापनाच्या तक्रारीवर आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, ‘भारतीयांची ही तक्रार हास्यास्पद आहे, कारण गाबा मैदानावर सरावाच्या सर्वोत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहेत.’

भारत पहिला डाव : ४०८ धावा, आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ५०५ धावा, भारत दुसरा डाव : मुरली विजय त्रि. गो. स्टार्क २७, शिखर धवन पायचित गो. लियॉन ८१, चेतेश्वर पुजारा झे. लियॉन गो. हेजलवूड ४३, विराट कोहली त्रि. गो. जॉन्सन १, अजिंक्य रहाणे झे. रहाणे गो. जॉन्सन १०, रोहित शर्मा झे. हॅडिन गो. जॉन्सन ००, महेंद्रसिंग धोनी पायचित गो. हेजलवूड ००, आर. अश्विन झे. हॅडिन गो. स्टार्क १९, उमेश यादव झे. हॅडिन गो. जॉन्सन ३०, वरुण अ‍ॅरोन झे. हेजलवूड गो. लियॉन ३, इशांत शर्मा नाबाद १, अवांतर ९, एकूण ६४.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा. गडी बाद क्रम : १/४१, २/७६, ३/८६, ४/८६, ५/७, ६/११७, ७/१४३, ८/२०३, ९/२११, १०/२२४. गोलंदाजी : जॉन्सन १७.३-४-६१-४, हेजलवूड १६-०-७२-२, स्टार्क ८-१-२७-२, वॉटसन १३-६-२७-०, लियॉन १०-१-३३-२. आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : ख्रिस रॉजर्स झे. धवन गो. इशांत ५५, डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. इशांत ६, शेन वॉटसन झे. धोनी गो. इशांत ००, स्टीव्हन स्मिथ धावबाद २८, शॉन मार्श झे. धोनी गो. यादव १७, ब्रॅड हॅडिन झे. कोहली गो. यादव १, मिशेल मार्श नाबाद ६, मिशेल जॉन्सन नाबाद २, अवांतर १५, एकूण २३.१ षटकांत ६ बाद १३० धावा. गोलंदाजी : इशांत ९-२-३८-३, यादव ९-०-४६-२, अ‍ॅरोन ५.१-०-३८-०.

 

Web Title: Again the defeat of defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.