आक्रमकता हेच कोहलीचे शस्त्र

By Admin | Published: January 5, 2015 03:13 AM2015-01-05T03:13:40+5:302015-01-05T03:13:40+5:30

भारताचा युवा कर्णधार विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमक शैलीची शास्त्रीने पाठराखण केली आहे. आक्रमकता हेच त्याचे शस्त्र आहे,

The aggression is Kohli's weapon | आक्रमकता हेच कोहलीचे शस्त्र

आक्रमकता हेच कोहलीचे शस्त्र

googlenewsNext

सिडनी : भारताचा युवा कर्णधार विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमक शैलीची शास्त्रीने पाठराखण केली आहे. आक्रमकता हेच त्याचे शस्त्र आहे, याच शैलीमुळे विराटला सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत मिळते, असेही शास्त्रीने सांगितले.
शास्त्री म्हणाला, ‘आक्रमक शैली फलंदाजीमध्ये त्याला उपयुक्त ठरत आहे. या मालिकेत त्याने तीन शतके झळकाविली आहेत. त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे आॅस्ट्रेलियात तो लोकप्रिय झाला आहे. धोनीचा कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती स्वीकारण्याच्या निर्णयाचा आदर करायला पाहिजे. कोहलीसोबत जवळीक वाढत असल्यामुळे धोनीने निवृत्ती स्वीकारल्याच्या वृत्ताचे शास्त्रीने खंडन केले. आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तीन कसोटी सामन्यानंतर अचानक निवृत्ती स्वीकारण्याच्या निर्णयामुळे संघातील सर्वच खेळाडूंना आश्चर्य वाटले.’ मुलाखतीमुळे शास्त्रीने भारतीय क्रिकेट संघातील विविध बाबींवर दिलखुलासपणे चर्चा केली. या मुलाखतीचा काही भाग खालीलप्रमाणे...


रैना की राहुल ?

> भारतीय संघ नवा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यासाठी मैदानावर दाखल होईल, त्यावेळी त्यांच्यापुढे मधल्या फळीत लोकेश राहुलला कायम राखायचे की अनुभवी सुरेश रैनाला संधी द्यायची, असा पेच राहणार आहे.
> भारतीय संघाने सिडनी कसोटी सामन्यासाठी रविवारी कसून सराव केला. सराबाबत विचार केला तर चौथ्या कसोटी सामन्यात रैनाला स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहेत, पण राहुलबाबतही डोळेझाक करता येणार नाही. रैना पहिल्या
तीन कसोटी सामन्यांत संघाबाहेर होता.
> रोहित शर्मा पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला तर राहुलला पदार्पणाच्या मेलबोर्न कसोटीत छाप सोडता आली नाही. त्यामुळे रैनाला संधी मिळण्याची शक्यता आहे. वन-डे क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा वसूल करणारा रैना कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. संघव्यवस्थापनाने आतापर्यंत या मालिकेत रोहित व राहुल यांना संधी दिली, पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. जर रैनाला सिडनी कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही तर कसोटी मालिकेत त्याला केवळ पर्यटक म्हणून संघासोबत ठेवण्याचा काय लाभ, असा सवाल उपस्थित होईल.

प्रश्न : विराट कोहलीची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच्या आक्रमकतेला लगाम घालणे आवश्यक वाटते का?
उत्तर : त्याच्या आक्रमकतेमध्ये काहीच चुकीचे नाही. त्याने जर तीन कसोटी सामन्यांत ५ धावा केल्या असत्या तर मी त्याच्यासोबत चर्चा केली असती, पण त्याने या मालिकेत ५०० धावा फटकाविल्या आहेत. त्यामुळे त्याची आक्रमकता संघासाठी उपयुक्त ठरत आहे. तो आक्रमक खेळाडू असून सर्वोत्तम कामगिरी करीत आहे. मेलबोर्नमध्ये व्हिव्हियन रिचर्डस् यांनी विराटची प्रशंसा केली. आॅस्ट्रेलियन प्रेक्षक त्याचे चाहते झाले आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमकता जपणारा क्रिकेटपटू त्यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर बघितला आहे. विराट युवा कर्णधार असून अनुभव मिळाल्यानंतर त्याच्यात परिपक्वता येईल.
प्रश्न : धोनीने संघसहकाऱ्यांपुढे निवृत्तीची घोषणा केली, त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये काय प्रतिक्रिया होती?
उत्तर : सर्वांना आश्चर्य वाटले. सामना संपलेला होता. तो सामन्यानंतरचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये आला होता. ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटची वेळ संपली असल्याचे सांगितले.
आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्याने समजदारीने घेतलेला तो निर्णय होता. त्याने आपल्या कुटुंबीयापूर्वी सहकारी खेळाडूंना याची माहिती दिली. तो सहकाऱ्यांना मान देणारा खेळाडू होता. त्यामुळे माझ्या नजरेत त्याची प्रतिमा आणखी उंचावली. आम्हा सर्वांसाठी हा आश्चर्यचकित करणारा निर्णय होता. आपल्याला काय सांगायचे आहे, याची त्याला चांगली कल्पना होती. धोनी भारतातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने कधीच आकड्यांचा विचार केला नाही. तो स्वत:सोबत प्रामाणिक होता. त्यामुळे संघसहकारी त्याचा आदर करतात. त्याने या युवा संघापुढे चांगले उदाहरण सादर केले.
प्रश्न : तुम्ही समालोचन कक्षात धोनीला बघितले आणि त्यानंतर संघाचे संचालक म्हणूनही त्याला बघण्याचा अनुभव मिळाला. कसोटी कर्णधार म्हणून धोनी तुम्हाला कसा वाटला. विशेषत: २०११-१२ मध्ये ८-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आणि कसोटी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीचा विचार करता त्याचे आकलन कसे कराल?
उत्तर : त्याच्यासाठी हे कठीण कार्य होते. विदेशात कसोटी क्रिकेटमध्ये २० बळी घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. अलीकडच्या कालावधीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला, पण विजय मिळविता आला नाही. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडमध्येही विजयाची संधी होती. येथे तिन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, पण विजय मिळविता आला नाही. हा युवा संघ असून सर्व खेळाडू शिकत आहेत. धोनीला आपण सर्वच ओळखतो. विजय मिळविण्यास तो उत्सुक होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची वेळ संपली असल्याची त्याला कल्पना आली. स्थान कायम राखून संघाला न्याय देता येणार नाही, असे त्याला वाटले. कोहली कर्णधारपद सांभाळण्यास तयार असून, रिद्धीमान साहा यष्टिरक्षकाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे. संघाचे भविष्य योग्य हातात असल्याची त्याला कल्पना आली. धोनीने त्याच्याकडे असलेले सर्वकाही भारतीय क्रिकेटला वाहिलेले आहे. तो भविष्यात आणखी काही वर्षे वन-डे क्रिकेट खेळेल आणि प्रतिस्पर्धी संघाला विचार करण्यास भाग पाडेल.
प्रश्न : २०१२ च्या डिसेंबर महिन्यात नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीने २०१३ मध्ये अखेरच्या कसोटी सामन्यात निवृत्तीचे संकेत दिले होते. पण त्याने पूर्ण वर्षभर प्रतीक्षा केली. त्यामागे काय कारण आहे?
उत्तर : त्याने सारासार विचार करून हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात संघावर बरीच मेहनत घेण्यात आली. आता युवा कर्णधाराच्या हाती संघाची सूत्रे सोपविण्याची योग्य वेळ असल्याचे त्याला वाटले असावे. निवृत्तीनंतर कर्णधारपदाबाबत चर्वितचर्वण न व्हावे, असा त्यामागचा हेतू असावा. तो कुठल्याही कारणाविना जात नसून वेळही अयोग्य आहे, असे वाटत नाही. धोनीने घेतलेला निर्णय नि:स्वार्थ भावनेने घेतलेला आहे. देशातर्फे २५ वर्षे प्रतिनिधित्व करणारा सचिन तेंडुलकर याला अपवाद ठरला. पण यापूर्वी अनेक खेळाडू आकड्यांचा विचार करून खेळले. त्यांना निवृत्तीच्या सामन्यात मोठ्या सन्मानाची अपेक्षा होती. पण काही खेळाडू याला अपवाद होते. त्यापैकी धोनी एक आहे. चाहते त्याच्याबाबत चर्चा करीत होते. धोनीने बुडत्या जहाजाला अधांतरी सोडले, अशी टीकाही करीत आहेत. खेळाचा विचार तर सोडून द्या, पण अशी टीका करणाऱ्यांनी धोनीने खेळलेले ५ टक्के क्रिकेट तरी बघितले आहे का?
प्रश्न : २०१५ च्या विश्वकप स्पर्धेनंतर डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. तुम्ही संघासोबत पूर्णकालीन भूमिका बजावण्यास तयार आहात का?
उत्तर : संघसंचालक म्हणून बीसीसीआयला संघासाठी हितावह असलेला सल्ला देणे माझे कार्य आहे. विश्वकप स्पर्धेनंतरही बीसीसीआयला भारतीय क्रिकेटच्या हितासाठी काय आवश्यक आहे, हेच सांगणार आहे. त्यानंतर संघाच्या हिताचे काय आहे काय नाही? याचा निर्णय बीसीसीआयला घ्यायचा आहे आणि मलाही ते मान्य राहील. त्यासाठी सध्या बराच वेळ आहे. सध्या आगामी तीन महिन्यात बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे.
प्रश्न : गेल्या सहा महिन्यात भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रूम व सराव सत्रामध्ये तुम्ही दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आहे. तुम्ही त्यांना काय सांगितले?
उत्तर : ड्रेसिंग रूममध्ये अनुकूल वातावरण तयार करणे माझे काम आहे. आम्ही सर्वच त्यासाठी प्रयत्नशील असतो. मग ते डंकन फ्लेचर असो किंवा आर. श्रीधर, बी. अरुण किंवा संजय बांगर असो. आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेटच्या भाषेत चर्चा करतो. क्रिकेटमध्ये अनुभव विकला जात नाही आणि विकतही घेता येत नाही. तो तुम्हाला खेळूनच मिळवावा लागतो. त्यामुळे आम्ही सर्वकाही विसरून विजयासाठी खेळावे, असा सल्ला देतो. ज्यावेळी मी सर्वप्रथम जबाबदारी स्वीकारली त्यावेळी माझ्या निदर्शनास आले की, खेळाडू खेळण्याचा आनंद घेत नाही. त्यामुळे माझे वैयक्तिक लक्ष खेळाडूंनी खेळाचा आनंद घ्यावा, यासाठी प्रयत्न करणे होते.
शेवटचा प्रश्न : खेळाडू खेळाचा आनंद का घेत नव्हते?
उत्तर : मी याबाबत अधिक भाष्य करू शकत नाही, पण मला मात्र तसे वाटले. मी खेळाडूंना सांगितले की, मैदानावर असणे म्हणजे ९ ते ६ ची नोकरी नाही. तुम्ही मैदानावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून त्याबाबत तुम्हाला अभिमान वाटायला हवा. प्रत्येक खेळाडू चांगला खेळ करू शकतो, पण त्यासाठी दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. तुम्ही जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक असलेल्या संघासोबत खेळत आहात. चांगली कामगिरी केली तर लाखो चाहते तुमचे अभिनंदन करतात आणि निराशाजनक कामगिरी केली तर टीकाही करतात. अगदी हेच मला तुमच्या खेळामध्ये झळकायला हवे. (वृत्तसंस्था)

Web Title: The aggression is Kohli's weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.