एआयबीएने सोनिया चहलबाबतचा निर्णय कायम राखला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:38 AM2018-11-20T04:38:12+5:302018-11-20T04:38:48+5:30
भारतीय बॉक्सर सोनिया चहलविरुद्ध विश्व चॅम्पियनशिपमधील लढत २-३ ने गमाविल्यानंतर पेत्रोव्हा स्टॅनिमिराने प्रशिक्षक भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता.
नवी दिल्ली : भारतीय बॉक्सर सोनिया चहलविरुद्ध विश्व चॅम्पियनशिपमधील लढत २-३ ने गमाविल्यानंतर पेत्रोव्हा स्टॅनिमिराने प्रशिक्षक भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एआयबीएने बल्गेरिया पथकाचे प्रशिक्षक पीटर यासिफोव्ह लेसोव्हची मान्यता रद्द केली. आता त्यांना रिंगमध्ये जाता येणार नाही.
सोनियाची प्रतिस्पर्धी निकालावर नाराज दिसली आणि तिने रिंगच्या बाहेर आल्यानंतर मी या निकालावर खूश नसल्याचे जाहीर केले. प्रशिक्षक धोकेबाजी करीत असून हा निकाल चुकीचा असल्याचे म्हटले. पेत्रोव्हाच्या प्रशिक्षकाने रेफरीच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता.
एआयबीएने या लढतीच्या समीक्षेबाबत अधिकृतपणे स्पष्ट केले की,‘एआयबीएला बल्गेरिरिया पथकाचे प्रशिक्षक पीटर यासिफोव्ह लेसोव्ह यांचे सोनिया-पेत्रोव्हा स्टॅनिमिरा यांच्यादरम्यानच्या लढतीनंतरचे वर्तन स्वीकारार्ह नाही. त्यामुळे त्यांचा अधिस्वीकृती पास रद्द करण्यात आला. त्यामुळे त्यांना रिंगमध्ये जाता येणार नाही.’
एआयबीएने पुढे स्पष्ट केले की,‘एआयबीए कुठल्याही स्थितीत अशा प्रकारचे वर्तन खपवून घेणार नाही. विशेषता प्रशिक्षकांचे हे वर्तन एआयबीएच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे. ही घटना पुढील चौकशीसाठी शिस्तपालन आयोगाकडे रेफर करण्यात येईल.’
सोनियाने माजी विश्व चॅम्पियन पेत्रोव्हा स्टॅनिमिराचा पराभव करीत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत सोनियाला कोलंबियाच्या मार्सेला कास्टेनाडाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
(वृत्तसंस्था)
आता उपांत्य फेरीचा निर्धार
अनुभवी पिंकी राणीव्यतिरिक्त सोनिया व सिमरनजित कौर यांनी सोमवारी दहाव्या एआयबीए महिला विश्व स्पर्धेत अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळविले. भारताच्या आठ बॉक्सर्स उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरल्या.
पाचवेळची विश्वविजेती एम.सी.मेरीकोमच्या (४८ किलो) नेतृत्वाखाली सर्व आठ बॉक्सर्स मंगळवारी उपांत्य फेरीतच्या निर्धाराने खेळतील.
यजमान देशाची अनुभवी बॉक्सर व माजी चॅम्पियन एल. सरिता देवी रविवारी स्पर्धेबाहेर झाली. आज साविटी बुरा (७५ किलो) हिला एलजिबिएटा वोजसिकविरुद्ध ०-५ ने पराभव स्वीकारावा लागला. सोनिया (५७ किलो) हिने दिवसाची सुरुवात माजी चॅम्पियन स्टॅनिमिरा पेत्रोव्हाविरुद्ध ३-२ ने विजय मिळवत केली.
पिंकीला (५१) इंग्लंडच्या युरोपियन चॅम्पियन एलिसी लिली जोन्सकडून विशेष आव्हान मिळाले नाही. तिने ५-० ने विजय मिळवला. पिंकीला आता आयर्लंडच्या एमी सारा ब्रोडहस्टच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सोनियाने माजी विश्व चॅम्पियन पेत्रोव्हा स्टॅनिमिराचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सोनियाला उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या मार्सेला कास्टेनाडाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मेरीकोमला मंगळवारी चीनच्या वु यूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. युवा बॉक्सर मनिषा मोनला (५४ किलो) उपांत्यपूर्व फेरीत स्टोयका पेट्रोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.