एअर इंडियाला पीएनबीचा धक्का
By admin | Published: June 10, 2016 03:37 AM2016-06-10T03:37:54+5:302016-06-10T03:37:54+5:30
१२व्या गुरु तेगबहादूर अखिल भारतीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) संघाने अनपेक्षित कामगिरी करताना गतविजेत्या एअर इंडिया, दिल्ली संघाला २-० असा पराभवाचा धक्का देताना १२व्या गुरु तेगबहादूर अखिल भारतीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. उत्कृष्ट नियोजन आणि सांघिक खेळाच्या जोरावर पीएनबीने एअर इंडियाला ‘क्रॅश’ करण्यात यश मिळवले. यासह यंदा एअर इंडियाला उपांत्य फेरीतच पॅकअप करावे लागले. स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी पीएनबीला बलाढ्य पश्चिम रेल्वेचे तगडे आव्हान पार करावे लागेल.
चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत दोन्ही संघांनी सावध सुरुवात केल्यानंतर पीएनबीने अचानकपणे आक्रमक पवित्रा घेत एअर इंडियाला गोंधळात पाडले. सतेंदर दलाल याने उजव्या बाजूने एअर इंडियाच्या क्षेत्रात मुसंडी मारताना त्यांची बचाव फळी भेदण्यात यश मिळवले आणि ११व्या मिनीटालाच वेगवान गोल करुन पीएनबीला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
यानंतर पीएनबीने हीच आघाडी कायम राखून मध्यंतराला वर्चस्व मिळवले. दुसऱ्या डावात एअर इंडियाने अपेक्षित आक्रमक खेळ करताना पुनरागमनाचा प्रयत्न केला. परंतु, पीएनबीचि भक्कम बचावफळी भेदण्यात त्यांना यश आले. त्यातच ५९व्या मिनिटाला अनुभवी गगनदीप सिंगने अप्रतिम गोल करताना पीएनबीला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
दोन गोलच्या पिछाडीमुळे दडपणाखाली आलेल्या एअर इंडियाकडून यावेळी अनेक चुका झाल्या. त्यांच्या आक्रमणामध्ये योग्य ताळमेळ न झाल्याने पीएनबीच्या बचावपटूंनी सर्वाधिक वेळ चेंडुवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. अखेरीत बचावपटूंनी एअर इंडियाच्या आक्रमकांना एकही गोल करण्यापासून दूर ठेवत संघाच्या शानदार विजयावर शिकामोर्तब केले. (क्रीडा प्रतिनिधी)
> ‘परे’ सुसाट... सांघिक खेळाचे प्रदर्शन
अन्य एका उपांत्य सामन्यात बलाढ्य पश्चिम रेल्वेने दणदणीत विजय मिळवताना रेल कोच फॅक्टरी, कपुरथाळा (आरसीएफ) संघाचा ५-१ असा फडशा पाडून अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्याच डावात ३-० अशी एकतर्फी आघाडी घेत ‘परे’ने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. दुसऱ्या डावात आरसीएफला केवळ एक गोल करण्यात यश आले. तर ‘परे’ने आणखी २ गोल करुन अंतिम फेरी निश्चित केली. अमित रोहिदासने दोन तर मलक सिंग, अय्याप्पा, विनोद सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करुन आरसीएफला लोळवले. पराभूत संघाकडून करणपाल सिंगने एकमेव गोल केला.