एअर इंडियाचे शानदार विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2015 03:45 AM2015-08-28T03:45:00+5:302015-08-28T03:45:00+5:30
अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात बलाढ्य एअर इंडियाने ११व्या गुरू तेग बहादूर गोल्ड कप आॅल इंडिया हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना तगड्या आर्मी ईलेव्हनला
मुंबई : अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात बलाढ्य एअर इंडियाने ११व्या गुरू तेग बहादूर गोल्ड कप आॅल इंडिया हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना तगड्या आर्मी ईलेव्हनला ३-१ असे नमवले. विशेष म्हणजे या विजेतेपदासह एअर इंडियाने ७ वर्षांनंतर या स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारली. यापूर्वी २००८ साली एअर इंडियाने इंडियन आॅइलला नमवून विजेतेपद पटकावले होते.
मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडच्या (एमएचएएल) वतीने चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमण व बचाव याचा सुरेख ताळमेळ साधताना सामना रंगतदार केला. मुळात अॅड्रीयन डीसूझा (एअर इंडिया) आणि नजमुद्दीन (आर्मी ईलेव्हन) या दोन्ही गोलरक्षकांनी निर्णायक कामगिरी करताना प्रतिस्पर्धी आक्रमकांना गोल करण्यापासून रोखल्याने निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. यानंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये एअर इंडियाच्या आक्रमकांनी बाजी मारली.
पहिल्या सत्राच्या तुलनेत दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ झाला. या वेळी आर्मी ईलेव्हनच्या बिनय भेंगरा याने एअर इंडियाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारताना गोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्या चुकांचा फायदा घेत एअर इंडियाच्या बचावपटूंनी त्याला गोल करण्यापासून रोखले.
निर्धारित वेळेनंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये एअर इंडियाचा गोलरक्षक अॅड्रीयन डीसूझाने भक्कम बचावाचे प्रदर्शन करताना एअर इंडियाला विजयी केले. त्याने आर्मी ईलेव्हनच्या विश्वा ठाकूर, रजनीश सॅलेरिया आणि बिनय भेंगरा यांचे स्ट्रोक रोखताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आर्मीच्या केवळ बिराज एक्काला डीसूझाचा बचाव भेदण्यात यश आले. तर एअर इंडियाकडून ए. बी. चियान्ना, विकास पिल्ले आणि जोगा सिंग यांनी गोल करून संघाच्या विजेतेपदावर शिक्का मारला. (क्रीडा प्रतिनिधी)
वैयक्तिक विजेते :
सामनावीर : अॅड्रीयन डीसूझा (एअर इंडिया)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : नजमुद्दीन (आर्मी ईलेव्हन)
सर्वोत्कृष्ट संरक्षक : रीनेल सिंग (आर्मी ईलेव्हन)
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक : मोहम्मद निझाम (मध्य रेल्वे)
सर्वोत्कृष्ट आक्रमक : युवराज वाल्मीकी (मध्य रेल्वे)