१६ वर्षांच्या आर. प्रज्ञानंदची विश्वविजेत्या कार्लसनवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:57 AM2022-02-22T06:57:09+5:302022-02-22T06:57:20+5:30
प्रज्ञानंद याने जागतिक क्रमवारीेत अव्वल स्थानावर असलेला विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याचा एकतर्फी पराभव करून खळबळ माजवून दिली.
चेन्नई : भारताचा युवा ग्रॅन्डमास्टर आर. प्रज्ञानंद याने एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीेत अव्वल स्थानावर असलेला विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याचा एकतर्फी पराभव करून खळबळ माजवून दिली. सोमवारी सकाळी प्रज्ञानंदने कार्लसनचा विजयी अश्वमेध रोखताना काळ्या मोहऱ्यांसह ३९ व्या चालीअखेर त्याच्यावर मात केली. कार्लसनने त्याआधी तिनही लढती जिंकल्या होत्या. १६ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत आणखी सात फेऱ्या शिल्लक आहेत.
या विजयामुळे प्रज्ञानंद १२ व्या स्थानावर पोहोचला. भारतीय ग्रॅन्डमास्टरचे आठ गुण झाले. त्याला लेव आरोनियनविरुद्ध विजय साजरा करता आला. याशिवाय दोन लढती अनिर्णित राहिल्या, तर चार लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.
प्रज्ञानंद याने २०१८ ला वयाच्या १२ व्या वर्षी भारताचा दिग्गज ग्रॅन्डमास्टर विश्वनाथन आनंद याचा विक्रम मोडित काढला होता. आनंदने १८ व्यावर्षी ग्रॅन्डमास्टर किताब पटकाविला होता. त्याआधी प्रज्ञानंद २०१६ ला ‘यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर’ बनला होता.