अबब...टी-२०मध्ये झळकावले ‘त्रिशतक’
By admin | Published: February 8, 2017 12:33 AM2017-02-08T00:33:01+5:302017-02-08T00:33:01+5:30
झटपट क्रिकेटच्या सध्याच्या काळामध्ये मोठमोठ्या धावसंख्येचे सातत्याने विक्रम होत असताना, दिल्ली क्रिकेटमध्ये मात्र कोणी स्वप्नातही विचार केला नसेल
नवी दिल्ली : झटपट क्रिकेटच्या सध्याच्या काळामध्ये मोठमोठ्या धावसंख्येचे सातत्याने विक्रम होत असताना, दिल्ली क्रिकेटमध्ये मात्र कोणी स्वप्नातही विचार केला नसेल असा धमाकेदार विक्रम रचला गेला आहे. दिल्ली रणजी संघातील २१ वर्षीय युवा यष्टिरक्षक - फलंदाज असलेल्या मोहित अहलावत याने टी-२० क्रिकेटमध्ये चक्क त्रिशतक झळकावून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले.
दिल्लीमधील ललिता पार्क मैदानात झालेल्या एका स्थानिक टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेत मोहितने फ्रेंड्स इलेव्हनविरुद्ध खेळताना अवघ्या ७२ चेंडूंत तब्बल १४ चौकार आणि ३९ षटकारांची आतषबाजी करताना ३०० धावांचा झंझावात केला. या खेळीमध्ये २३४ धावा त्याने षटकारांसह, तर ५६ धावा चौकारांसह काढल्या. म्हणजेच केवळ १० धावा त्याने धावून काढल्या. मोहितच्या या रुद्रावताराच्या जोरावर त्याच्या मावी इलेव्हन या संघाने निर्धारित २० षटकांत ४१६ धावांचा ‘एव्हरेस्ट’ उभारला.
दुसरीकडे, मोहितला साथ देणारा अन्य सलामीवीर गौरवने ३९ चेंडंूत ८६ धावांची वेगवान खेळी केली. मात्र, मोहितच्या तडाख्यापुढे गौरवची खेळी खूप लहान ठरली. (वृत्तसंस्था)
पहिल्यांदाच रणजी स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो होतो. आता, त्या कमजोरी दूर करीत आहे आणि पुन्हा एकदा रणजीसाठी संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. चांगला खेळ केल्यास नक्कीच देशासाठी खेळण्याची संधी मिळेल. सुरुवातीपासून मी आक्रमक फलंदाजी केली. १५० धावा केल्यानंतर मला जाणवले की धावसंख्या आणखी वाढवता येऊ शकते.
- मोहित अहलावत
या धावसंख्येला पाहून मी चकित
झालो आहे. मोहित खूप गुणवान आहे. त्याने फिरोजशाह कोटलासारख्या मैदानावर देखील दीडशे धावांच्या खेळी खेळल्या आहेत. तो कसलेला यष्टीरक्षक - फलंदाज आहे आणि त्याचे फटके तंत्रशुद्ध असतात. त्याच्या या खेळीनंतर त्याला नक्कीच मोठ्या स्तरावरही संधी मिळेल.
- संजय भारद्वाज, प्रशिक्षक
मोहितने दिल्लीकडून आतापर्यंत तीन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मात्र, त्याला आपली चमक दाखवण्यात अपयश आले आहे. या धमाकेदार फलंदाजाने तीन प्रथम श्रेणी सामन्यातून केवळ ५ धावा काढल्या आहेत.
मोहित हा विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या भारताच्या
आजी - माजी कर्णधारांचा जबरदस्त फॅन आहे. तो धोनीचा ‘हॅलोकॉप्टर शॉट’ मारण्याचा कायम प्रयत्न करीत असतो.
असा रंगला
मोहितचा दांडपट्टा...
आपल्या खेळीतील अखेरचा ५० धावांचा टप्पा म्हणजे (२५० ते ३००) मोहितने केवळ १२ चेंडंूत गाठला.
मावी इलेव्हनकडून सलामीला खेळताना मोहितने डावातील अखेरच्या षटकातील अखेरच्या ५ चेंडंूवर सलग ५ षटकार ठोकले.
१८व्या षटकाअखेर मोहित २५० धावांवर नाबाद होता.
अखेरच्या २ षटकांमध्ये ५० धावा कुटताना त्याने टी-२० क्रिकेटमधील पहिले त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला.