राष्ट्रीय स्पर्धेत एआयटीएला खेळाडूंचा सहभाग अपेक्षित, खेळाडूंवर सक्ती न करण्याची महासंघाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:23 AM2017-09-11T02:23:27+5:302017-09-11T02:23:40+5:30
नवी दिल्ली : राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा दर्जा उंचावण्यासाठी आतूर असलेल्या एआयटीएने देशातील अव्वल खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे, पण याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही. कारण महासंघ या खेळाडूंना सूट देण्यास तयार आहे.
एआयटीएने ३१ आॅगस्ट रोजी जाहीर केले होते, की खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी अनुदान मिळवण्यास व भारतीय संघाची निवड करण्यास मदत होईल. पण, महासंघाने सवलत दिल्यामुळे खेळाडूंना सहभागी होण्यासाठी सक्ती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले.
क्रीडा मंत्रालयाने अखिल भारतीय टेनिस महासंघाला (एआयटीए) राष्ट्रीय स्पर्धेबाबत विचारणा केली. त्यावेळी या स्पर्धेत केवळ दुय्यम दर्जाचे खेळाडू सहभागी होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. मंत्रालयाने एआयटीएला थेट निर्देश दिले नसले तरी स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग झालेला बघण्यास आवडणार असल्याचे म्हटले आहे.
एआयटीएने कबुली दिली, की जर अव्वल खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले तर महासंघाला सरकारकडून खेळाडूंसाठी आर्थिक सहकार्य मिळविणे सोपे होईल.
एआयटीएचे महासचिव हिरण्मय चॅटर्जी म्हणाले, ‘राष्ट्रीय स्पर्धेत अनेक देशांमध्ये दुय्यम दर्जाचे खेळाडू सहभागी होतात. आपल्याला राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा उंचवावा लागेल. त्यामुळे सर्व खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे एआयटीएसाठी राष्ट्रीय चॅम्पियनला आर्थिक सहकार्य देण्याबाबत विनंती करणे सोपे जाईल.’
राष्ट्रीय जेतेपद मिळविण्यासाठी प्रलोभन देण्यात येत असले तरी जोपर्यंत एआयटीए खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य करीत नाही तोपर्यंत युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, रोहन बोपन्ना किंवा अंकित रैना या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. राष्ट्रीय चॅम्पियनला आतापर्यंत आयोजकांतर्फे पाच लाख आणि सरकारतर्फे पाच लाख रुपयांचे अनुदान मिळत होते. ही रक्कम ५० हजार डॉलरची एटीपी चॅलेंजर जिंकण्याच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यात विजेत्याला ७२०० डॉलर (जवळजवळ ४.५ लाख रुपये) मिळतात.
हे सर्वस्वी खेळाडूंवर अवलंबून राहील. आघाडीचे खेळाडू यातून माघार घेऊ शकतात. राष्ट्रीय विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश देता येईल. या प्रोत्साहनाचा लाभ घेण्यास इच्छुक आहे किंवा नाही, हे सर्वस्वी खेळाडूंवर अवलंबून राहील.
- हिरण्मय चॅटर्जी,
एआयटीएचे महासचिव