अजय, प्रणय उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: July 2, 2016 05:50 AM2016-07-02T05:50:15+5:302016-07-02T05:50:15+5:30

भारताच्या सहा खेळाडूंनी ५५ हजार डॉलर्स पुरस्कार राशी असलेल्या कॅनडा ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

Ajay, Pranay in the quarter-finals | अजय, प्रणय उपांत्यपूर्व फेरीत

अजय, प्रणय उपांत्यपूर्व फेरीत

Next


कॅलगेरी : अजय जयराम व एच. एस. प्रणय यांच्यासह भारताच्या सहा खेळाडूंनी ५५ हजार डॉलर्स पुरस्कार राशी असलेल्या कॅनडा ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित जयरामने पुरुष एकेरीत आॅस्ट्रियाच्या डेव्हिड ओरनोस्टरेरचा २१-१०, २१-१२ने पराभव केला. त्याला पुढच्या फेरीत मायदेशाच्या हर्षिल दाणीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दाणी याने प्रतुल जोशीचा २१-९, २१-१८ ने पराभव केला.
उपउपांत्यपूर्व फेरीतील अन्य एका लढतीत दुसऱ्या मानांकित एच. एस. प्रणय याने कॅनडाच्या बी. आर. संकीर्तची झुंज २१-१८, १८-२१, २१-१२ ने मोडून काढली. पुढच्या फेरीत त्याला सातवे मानांकन प्राप्त फ्रान्सचा खेळाडू ब्राईस लेव्हरडेजसोबत लढत द्यावी लागेल.
मिश्र दुहेरीत मनू अत्री व पोनप्पा या भारतीय जोडीने कॅनडाच्या जोनाथन लेई व मिशेल तोंग यांचा २१-१४, २१-१२ ने पराभव केला.
मनू अत्री व बी. सुमित रेड्डी या भारतीय जोडीला पुरुष दुहेरीत अव्वल मानांकित जोडी कॅनडाचा टेड चीन ताई चेन व चिनी ताइपेच्या चाओ सियांग यांच्यासोबत लढत द्यावी लागेल. रिओसाठी पात्र ठरलेल्या भारतीय जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत टिमोथी चियू व जेसन हो शुई या स्थानिक जोडीचा २१-८, २१-१० ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
महिला एकेरीत २०१५ ची राष्ट्रीय चॅम्पियन रुत्विका शिवानी गाडे हिने आॅस्ट्रियाच्या एलिझाबेथ बेलडॉफचा २४-२२, २१-१८ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रुत्विकाला पुढच्या फेरीत चौथ्या मानांकित बुल्गारियाच्या लिंडा जेचिरीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
अन्य लढतीत तन्वी लाडने अमेरिकेच्या माया चेनचा २१-१४, २१-१५ ने पराभव केला. तिला पुढच्या फेरीत तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या इरिस वांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीला महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत बाय मिळाला. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीला आॅस्ट्रेलियाच्या लीनी चू व कॅनडाच्या राचेल होंड्रिच या जोडीसोबत लढत द्यावी लागेल.

Web Title: Ajay, Pranay in the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.