अजिंक्यने राखली मुंबईची शान
By admin | Published: March 28, 2017 02:00 PM2017-03-28T14:00:05+5:302017-03-28T14:43:25+5:30
विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यातून माघार घेतली आणि अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची संधी मिळाली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - खांद्याच्या दुखापतीमुळे विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यातून माघार घेतली आणि अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची संधी मिळाली. अजिंक्यसाठी ही संधी म्हणजे एक खडतर आव्हान होते. कारण त्याचा स्वत:चा सूर हरवलेला होता आणि मालिकेचा निकाल लावणारी ही कसोटी होती. पण अजिंक्यने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला.
कर्णधार बनल्यानंतर अजिंक्यची सहाजिकच विराटच्या नेतृत्वाची तुलना होणे स्वाभाविक होते. विराटच्या तुलनेत अजिंक्य शांत, संयमी स्वभावाचा आहे. मैदानावर तो विराटसारखा आक्रमक दिसत नाही. पण चौथ्या कसोटीत कर्णधार या नात्याने त्याने फलंदाजी आणि डावपेचांमधून आक्रमकता दाखवली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरु झाल्यापासून त्याचा सूर हरवलेला होता. धावांसाठी झगडा सुरु होता. फक्त बंगळुरुच्या दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या डावात त्याने केलेली 52 धावांची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली होती. फॉर्मसाठी चाचपडणा-या अजिंक्य समोर कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी होती. संघनायक या नात्याने त्याला इतरांसमोर आदर्श ठेवायचा होता. त्यात तो ब-यापैकी यशस्वी ठरला. चौथ्या कसोटीत त्याने दोन्ही डावात मिळून 84 धावा केल्या.
पहिल्या डावात 46 तर, दुस-या डावात नाबाद 38 धावा. धावांचा आकडा मोठा नसला तरी, खेळपट्टीचा नूर पाहता या धावा पुरेशा होत्या. दुस-या डावात लागोपाठ दोन फलंदाज बाद झाल्यानंतर भारत बॅकफुटवर जातो कि, काय असे काही क्षणांसाठी वाटले होते. पण अजिंक्यने आत्मविश्वासाने आक्रमक फलंदाजी करुन आणखी पडझड होऊ दिली नाही. त्याने 38 धावांच्या छोटया खेळीत चार चौकार आणि दोन षटकार ठोकले.
कर्णधार म्हणून त्याने गोलंदाजीत केलेल्या बदलांचेही कौतुक झाले. दुस-या डावात भारताला अगदी नाममात्र 32 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखायचे होते. अजिंक्यने अत्यंत कल्पकतेने गोलंदाजीत बदल केले. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 137 धावात आटोपला. पहिल्या तीन कसोटीत विराटने ज्या पद्धतीने गोलंदाजांना हाताळले त्यावर बरीच टीका झाली होती. अजिंक्यने त्या तुलनेत आपले वेगळेपण सिद्ध केले.
अजिंक्य भारताचा 33 वा कसोटी कर्णधार आहे. कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे संभाळून अजिंक्यने पॉली उमरीगर, नरी कॉन्ट्रॅक्टर, जीएस रामचंद, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मुंबईच्या या दिग्गजांनी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. मुंबईने देशाला अनेक उत्तम क्रिकेटपटू दिले आहेत