अजिंक्य रहाणे भारताचा 33 वा कसोटी कर्णधार
By admin | Published: March 25, 2017 11:46 AM2017-03-25T11:46:36+5:302017-03-25T11:46:36+5:30
विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात खेळत नसल्याने अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - खांद्याच्या दुखापतीमुळे विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात खेळत नसल्याने अजिंक्य रहाणेला नेतृत्वाची संधी मिळाली आहे. मुंबईकर अजिंक्य भारताचा 33 वा कसोटी कर्णधार आहे. विराटच्या तुलनेत अजिंक्य शांत, संयमी स्वभावाचा आहे. सध्या सुरु असलेल्या मालिकेत अजिंक्यला अद्याप सूर गवसलेला नाही. धावांसाठी त्याचा झगडा सुरु आहे.
फक्त बंगळुरुच्या दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या डावात त्याने केलेली 52 धावांची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली होती. फॉर्मसाठी चाचपडणा-या अजिंक्य समोर कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी असेल. संघातील विराट कोहलीची जागा भरुन काढणे सोपे नाही. अजिंक्यला त्या ताकदीचा खेळ करावा लागेल तसेच संघनायक म्हणून अचूक निर्णय घ्यावे लागतील. रांची कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती. सामन्याच्या पूर्वसंध्येलाच कोहलीने आपण चौथा कसोटी सामना खेळणार नसल्याचे संकेत दिले होते. कोहलीने नेटवर सराव केला पण फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हेच माझ्या खेळण्याचा निर्णय घेतील, असेही त्याने स्पष्ट केले होते.
कर्णधारपदाची धुरा संभाळून अजिंक्यने पॉली उमरीगर, नरी कॉन्ट्रॅक्टर, जीएस रामचंद, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. मुंबईच्या या दिग्गजांनी भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. मुंबईला भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाते. मुंबईने देशाला अनेक उत्तम क्रिकेटपटू दिले आहेत.
संघात आज दोन बदल करण्यात आले आहेत. कोहलीच्या जागी डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कसोटी पदार्पण करत आहे. इशांत शर्माच्या जागी भुवनेश्वर कुमारची निवड करण्यात आली आहे.