अजिंक्य रहाणे कर्णधार, झिम्बाब्वे दौ-यात दिग्गजांना झटका
By admin | Published: June 29, 2015 01:30 PM2015-06-29T13:30:57+5:302015-06-29T15:43:42+5:30
सातत्यपूर्ण खेळ करणा-या आणि क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणांसाठी चर्चेत न राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ सोपवण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - भारतीय क्रिकेटमधल्या दिग्गज खेळाडुंना झिम्बाब्वे दौ-यासाठी विश्रांती देण्याच्या नावाखाली निवड समितीने चांगलाच झटका दिला असून ढोणी, कोहली, रोहीत, धवन आणि रैना यांना संघाबाहेर बसवले आहे. सातत्यपूर्ण खेळ करणा-या आणि क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कारणांसाठी चर्चेत न राहिलेल्या अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ सोपवली आहे. भविष्यासाठी व लांबच्या पल्ल्याचा विचार करून नवोदितांना संधी देण्यात येत असल्याचे बीसीसीआयने म्हटले असून त्याचवेळी केवळ कागदावरच्या वाघांना नाही तर सातत्यपूर्ण कामगिरी करणा-यांनाच निवडले जाईल असा संदेशही निवड समितीने दिला आहे. १० जुलैपासून हा दौरा सुरू होणार असून त्यात ३ एकदिवसीय व २ टी-२० सामने खेळण्यात येणार आहेत.
रहाणेच्या नेतृत्वाखालील टीममध्ये हरभजन सिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, स्टुअर्ट बिन्नी, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, मुरली विजय, अंबती रायडू, केदार जाधव व कर्ण शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.
बांग्लादेशाकडून ३ - १ असा मानहानिकारक पराभवामुळे तर हा धक्कादायक निर्णय घेण्यात नाही ना आला अशी शंका घ्यायला जागा असून, ढोणीने राजीनामा देण्याची दाखवलेली तयारी, कोहलीने ढोणीच्या नेतृत्वावर दाखवलेला अविश्वास अशा अनेक बाबींची किनार या निर्णयामागे असण्याची शक्यता आहे.
ज्या पाच दिग्गजांना विश्रांतीच्या नावाखाली डच्चू देण्यात आला आहे त्यांची बांग्लादेशातली कामगिरी पुढे दिली असून, खराब कामगिरी केल्यास कुणालाही वगळले जाऊ शकते असा इशाराच बीसीसीआयने दिला असण्याची शक्यता आहे.
रोहीत शर्मा - तीन सामन्यांत ६३, ० व २९ धावा
शिखर धवन - तीन सामन्यात ३०, ५३ व ७५
विराट कोहली - १, २३ व २५
महेंद्रसिंग ढोणी - ५, ४७ व ६९
सुरेश रैना - ४०, ३४ व ३८