अजिंक्य रहाणेचे शतक, भारताची पकड मजबूत

By Admin | Published: August 23, 2015 11:53 PM2015-08-23T23:53:31+5:302015-08-23T23:53:31+5:30

अजिंक्य रहाणेचे शतक व रवीचंद्रन आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा डाव खेळणाऱ्या कुमार संगकाराविरुद्ध वर्चस्व कायम राखल्यामुळे

Ajinkya Rahane's century, India's grip is strong | अजिंक्य रहाणेचे शतक, भारताची पकड मजबूत

अजिंक्य रहाणेचे शतक, भारताची पकड मजबूत

googlenewsNext

कोलंबो : अजिंक्य रहाणेचे शतक व रवीचंद्रन आश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचा डाव खेळणाऱ्या कुमार संगकाराविरुद्ध वर्चस्व कायम राखल्यामुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर मजबूत पकड मिळवली. भारताने दुसरा डाव ८ बाद ३२५ धावसंख्येवर घोषित करीत श्रीलंकेपुढे विजयासाठी ४१३ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेने चौथ्या दिवसअखेर २ बाद ७२ धावांची मजल मारली होती. श्रीलंकेला विजयासाठी अद्याप ३४१ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रहाणेने झळकाविलेले शतक भारताच्या दुसऱ्या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. त्याने १२६ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. त्याने मुरली विजयसह (८२) दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केल्यानंतर रोहित शर्मासोबत (३४) चौथ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करीत भारतीय संघाला मजबूत स्थिती गाठून दिली.
श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात सर्वांची नजर संगकाराच्या कामगिरीवर केंद्रित झाली होती. त्याला लवकरच संधी मिळाली, पण केवळ १८ चेंडू खेळून तो माघारी परतला. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने (नाबाद २५) व कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (नाबाद २३) यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. आश्विनने २७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करण्यासाठी उशीर केला. त्याने वृद्धिमान साहाला पुन्हा फलंदाजीसाठी पाठविले. सुरुवातीला फलंदाजी करताना स्नायूच्या दुखापतीमुळे तो रिटायर्ड झाला होता. श्रीलंकेचा डाव सुरू झाला त्या वेळी साहा मैदानावर उतरला नाही. त्याच्या स्थानी के. एल. राहुलने यष्टिरक्षण केले. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रसाद व थारिंदू कौशल यांनी प्रत्येकी चार बळी घेतले.
श्रीलंकेची सलामी जोडी संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरली. गोलंदाजीची सुरुवात करणाऱ्या आश्विनने दुसऱ्या षटकात कौशल सिल्वाला (१) मिडविकेटला तैनात स्टुअर्ट बिन्नीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अखेरचा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या संगकाराला श्रीलंका व भारतीय संघातील खेळाडूंनी ‘गॉर्ड आॅफ आॅनर’ दिले. डावखुऱ्या संगकाराने आश्विनच्या गोलंदाजीवर फ्लिकचा फटका मारत खाते उघडले. त्यानंतर त्याने तीन चौकार ठोकले. पण आश्विनने या महान फलंदाजाला माघारी पाठवत भारताला दुसरे यश मिळवून दिले. आश्विनच्या गोलंदाजीवर संगकाराचा उडालेला झेल विजयच्या हातात विसावला. संगकारा बाद झाल्यानंतर पी. सारा ओव्हल स्टेडियममध्ये काही वेळेसाठी स्मशानशांतता पसरली. त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून या महान खेळाडूला मानवंदना दिली. संगकारा अखेरच्या डावात १८ धावा काढून बाद झाला. आश्विनने मालिकेत सलग चौथ्यांदा त्याला बाद केले.
त्याआधी, भारताने कालच्या १ बाद ७० धावसंख्येवरून पुढे खेळताना आज ८ बाद ३२५ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. विजय व रहाणे यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावल्यानंतर नैसर्गिक फलंदाजी केली.

धावफलक
भारत पहिला डाव : ३९३.
श्रीलंका पहिला डाव : ३०६.
भारत दुसरा डाव : मुरली विजय पायचित गो. कौशल ८२, के. एल. राहुल त्रि. गो. प्रसाद ०२, अजिंक्य रहाणे झे. चंडीमल गो. कौशल १२६, विराट कोहली पायचित गो. कौशल १०, रोहित शर्मा झे. मुबारक गो. कौशल ३४, स्टुअर्ट बिन्नी झे. थिरिमाने गो. प्रसाद १७, वृद्धिमान साहा नाबाद १३, आर. आश्विन झे. चंडीमल गो. प्रसाद १९, अमित मिश्रा झे. मुबारक गो. प्रसाद १०, उमेश यादव नाबाद ०४. अवांतर (८). एकूण : ९१ षटकांत ८ बाद ३२५ (डाव घोषित). गडी बाद क्रम : १-३, २-१४३, ३-१७१, ४-२५६, ५-२६२, ६-२८३, ७-३११, ८-३१८. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद १५-०-४३-४, हेराथ २९-४-९६-०, चमीरा १४-०-६३-०, मॅथ्यूज २-१-१-०, कौशल ३१-१-११८-४.
श्रीलंका दुसरा डाव : कौशल सिल्वा झे. बिन्नी गो. आश्विन ०१, दिमुथ करुणारत्ने खेळत आहे २५, कुमार संगकारा झे. विजय गो. आश्विन १८, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज खेळत आहे २३. अवांतर (५). एकूण : २१ षटकांत २ बाद ७२. बाद क्रम : १-८, २-३३. गोलंदाजी : आश्विन १०-५-२७-२, उमेश यादव २-०-१०-०, ईशांत ४-०-१८-०, मिश्रा ५-१-१३-०.
(वृत्तसंस्था)

Web Title: Ajinkya Rahane's century, India's grip is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.