अजित चंदिलावर आजीवन बंदी
By admin | Published: January 19, 2016 03:28 AM2016-01-19T03:28:26+5:302016-01-19T03:28:26+5:30
आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी झालेला राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अजित चंदिलावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन सदस्यांच्या
मुंबई : आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी झालेला राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अजित चंदिलावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन सदस्यांच्या शिस्तपालन समितीने सोमवारी आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तर मुंबईच्या हिकेन शाहवर पाच वर्षांची बंदी घातली. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या शिस्तपालन समितीने हा निर्णय घेतला.
२०१३ मध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चंदिला दोषी आढळला होता. त्या वेळी त्याला या प्रकरणात अटकही झाली होती. राजस्थान रॉयल्सचे अन्य खेळाडू शांताकुमारन श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांनाही या प्रकरणात अटक झाली होती.
याव्यतिरिक्त बीसीसीआयने मुंबईच्या हिकेन शाहला पाच वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. शाहवर त्याच्या प्रथम श्रेणी संघातील सहकारी खेळाडूसोबत फिक्सिंगसाठी संपर्क केल्याचा आरोप आहे. ज्या खेळाडूसोबत शाह याने संपर्क केला होता, तो खेळाडू आयपीएलमध्ये खेळतो. या खेळाडूने याबाबतची तक्रार आपल्या फ्रॅन्चायझीला केली होती. बीसीसीआयने त्यानंतर त्याची माहिती गुन्हे शाखेला दिली होती.
बीसीसीआयने म्हटले आहे, ‘‘अजित चंदिला विविध कलमांखाली दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात येत आहे. या कालावधीत त्याला बीसीसीआय व बीसीसीआयसोबत संलग्न असलेल्या कुठल्याही संघटनेसोबत क्रिकेटच्या कुठल्याही स्वरूपात जुळता येणार नाही.’’
बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने मुंबई येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत चंदिला व हिकेन यांच्याबाबत निर्णय घेतला. याव्यतिरिक्त २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी असलेले पाकिस्तानचे माजी पंच असद रौफ यांच्याबाबतही बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला.
रौफ यांनी बोर्डाच्या कारवाईमध्ये पारदर्शीता नसल्याचा आरोप करताना दुसऱ्या चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. माजी अम्पायर येथे बोर्डापुढे बैठकीमध्ये वैयक्तिकरीत्या उपस्थित नव्हते, पण त्यांनी लेखी स्वरुपात बोर्डापुढे अपील केले. शिस्तपालन समितीने हे अपील फेटाळून लावले.
बोर्डाचे अध्यक्ष मनोहर, ज्योतिरादित्य शिंदे आणि निरंजन शाह यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यांच्या समितीने माजी पाकिस्तानी पंचाविरुद्धचा निर्णय १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. रौफला लिखित उत्तर देण्यासाठी ९ फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.
यापूर्वी चंदिला आणि शाह या प्रकरणात समितीपुढे डिसेंबर २०१५ ला स्वत: उपस्थित होते आणि बोर्डाने त्यांना लिखित उत्तर देण्यासाठी ४ जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर समितीने ५ जानेवारी रोजी बैठक घेतली आणि त्यात हिकेनने समितीपुढे उपस्थिती नोंदवताना आपले लेखी व तोंडी उत्तर दिले होते.
भारतीय बोर्डामध्ये पारदर्शीता आणण्यासाठी आणि बोर्डाची प्रतिमा सुधारण्याबाबत अध्यक्ष मनोहर गंभीर आहेत. याबाबत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात राजस्थानचा माजी क्रिकेटपटू चंदिलावर आजीवन बंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आयपीएलच्या सहाव्या पर्वातील भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या जस्टिस लोढा समितीने राजस्थान रॉयल्स फ्रॅन्चायझीला गेल्या वर्षी स्पर्धेतून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. (वृत्तसंस्था)
रौफ वैयक्तिक उपस्थित झाले नाही आणि त्यांनी बोर्डाची सुनावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याचे लिखित उत्तरात म्हटले असून चौकशीसाठी अन्य अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. बोर्डाने रौफ यांचे अपील फेटाळून लावले. बोर्डाने रौफ यांना उत्तर देण्यासाठी आणि पुरावे सादर करण्यासाठी ९ फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली आहे. ही या प्रकरणाची अखेरची तारीख राहणार असून याबाबतचा निर्णय १२ फेब्रुवारी रोजी होईल.
- अनुराग ठाकूर