एल्गर, ड्युमिनीची शतके ; आफ्रिका मजबूत स्थितीत
By admin | Published: November 6, 2016 02:40 AM2016-11-06T02:40:03+5:302016-11-06T02:40:03+5:30
सलामीचा फलंदाज डीन एल्गर आणि जेपी ड्युमिनी यांच्या शानदार शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात ६ बाद ३९० धावा केल्या.
पर्थ : सलामीचा फलंदाज डीन एल्गर आणि जेपी ड्युमिनी यांच्या शानदार शतकांमुळे दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात ६ बाद ३९० धावा केल्या. या दोघांच्या २५० धावांच्या भागीदारीमुळे आफ्रिकेकडे तिसऱ्या दिवसाच्या अखेरीला ३८८ धावांचा आघाडी आहे.
या सामन्यात पहिल्या डावात आॅस्ट्रेलियाला दोन धावांची आघाडी मिळाली होती. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत एकूण २२ फलंदाज बाद झाले. तिसऱ्या दिवशी एल्गर आणि डुमिनी यांनी दबादबा कायम राखला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ७४.२ षटकांत २५० धावांचा भागीदारी केली. एल्गरने कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. त्याने ३१६ चेंडंूत १२७ धावा केल्या. त्यात १७ चौकार आणि १ षटकार होता, तर डुमिनीने २२५ चेंडूंत १४१ धावा केल्या, त्यात २० चौकार आणि एक षटकार होता.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात २४२ धावांवर बाद झाला होता तर आॅस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या दिवशी २४४ धावांवर तंबूत परतला. आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी दोन बाद १०४ या धावसंख्येहून पुढे खेळण्यास सुरुवात केली. एल्गरने ४६ धावा केल्या तर ड्युमिनीने ३४ धावा करत डाव पुढे नेला. दोन्ही फलंदाजांनी उपहारापर्यंत आपल्या संघाचा स्कोअर १८३ धावांपर्यंत नेला. त्या वेळी एल्गर ६९ आणि डुमिनी ७४ धावांवर खेळत होते.
ड्युमिनीने आक्रमक खेळ केला. त्याने १६९ चेंडंूत १७ चौकार लगावत शतक पूर्ण केले. तिसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी ३५२ चेंडूंत पूर्ण झाली. एल्गरनेही २५५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. जोश हेझलवूडने एल्गरला बाद केले. तेंबा बावूमा ८ धावा करून बाद झाला तर मिशेल स्टार्कने कर्णधार फाफ डू प्लेसीसला बाद केले. डी कॉक आणि फिलंडर यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला ३९० ही धावसंख्या गाठून दिली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
पहिला डाव द. आफ्रिका सर्वबाद २४२, आॅस्ट्रेलिया सर्वबाद २४४
दुसरा डाव ६/३९० (स्टिफन कुक १२, डीन एल्गर १२७, हशीम आमला १, जेपी ड्युमिनी १४१, फाफ डु प्लेसीस ३२, डी कॉक खेळत आहे १६, व्हर्नन फिलंडर खेळत आहे २३, गोलंदाजी : जोश हेझलवुड २/९७, पीटर सीडल २/४७, मिशेल मार्श १/५२, मिशेल स्टार्क १/९९)