कोहली-शास्त्रीकडे असेल सर्वांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:20 AM2017-07-21T01:20:09+5:302017-07-21T01:20:09+5:30
मोठ्या वादानंतर प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर टीम इंडिया अखेर श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली. दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला गेलेल्या भारतीय
- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
मोठ्या वादानंतर प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर टीम इंडिया अखेर श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली. दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला गेलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेला त्यांच्याच देशात पराभूत केले होते. त्या वेळी, रवी शास्त्री संघाचे निर्देशक होते आणि आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. महत्त्वाचे म्हणजे श्रीलंकेला त्यांच्या भूमीमध्ये नमवणे सोपे नाही.विशेष म्हणजे, २२ वर्षांनंतर भारतीयांनी लंकेत मालिका विजय मिळवला होता. या वेळी काय होणार?
लंकेचा यंदाचा संघ तुलनेत कमजोर दिसत आहे. नुकताच त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध रोमांचक विजय मिळवला असला, तरी त्यांचा संघ तेवढा बलाढ्य दिसत नाही. त्यांच्याकडे म्हणावे तसे चांगले फलंदाज आणि गोलंदाज नाही. पण, ही एक संधीदेखील आहे की जी नवीन जोडी मिळाली आहे त्या जोरावर भारताने आगामी आॅस्टे्रलिया, दक्षिण आफ्रिकासारख्या मोठ्या दौऱ्यासाठी चांगले तयार व्हावे. तसेच, एकप्रकारचे दडपणही असेल, ते म्हणजे रँकिंमध्ये भारत आघाडीवर आहे, संघात
अनेक स्टार्स आहेत, प्रशिक्षक व कर्णधाराची जोडी पुन्हा एकत्र आले आहेत, त्यामुळे भारतीय संघाने चांगली कामगिरी करावी ही अपेक्षा चाहत्यांनी बाळगली आहे.
माझ्या मते संघातील फलंदाजी व गोलंदाजीचा ताळमेळ जबरदस्त आहे. श्रीलंकेत खूप खेळले असल्याने तेथील वातावरणाचीही खेळाडूंना फारशी चिंता नसेल. पण, सुरुवातीपासूनच चांगली लय पकडणे हे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे, तसेच श्रीलंकेला संधी देता कामा नये. कारण, जर का लंकेला संधी मिळाल, तर ते घरच्या मैदानाचा फायदा उचलत भारतीय संघाला अडचणीत आणू शकतील.
श्रीलंकेमध्ये कोहली आणि शास्त्री यांचे सर्वांत जास्त लक्ष असेल ते गोलंदाजीकडे. कारण, जर तुम्हाला विदेशात मालिका जिंकायची असेल, तर तुम्हाला फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांची कामगिरी प्रभावी होणे महत्त्वाचे असते. दरम्यान, ही मालिका उपखंडात असल्याने फिरकीपटू चमक पाडतील. मात्र, जेव्हा भारत दक्षिण आफ्रिका व आॅस्टे्रलिया दौऱ्यावर जाईल, तेव्हा फिरकी व वेगवान गोलंदाजांमध्ये ताळमेळ होणे अत्यंत आवश्यक होईल. त्याचबरोबर, फलंदाजीमध्ये मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्याने सलामीवीर म्हणून शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सलामीजोडीमध्ये थोडा लवचिकपणा दिसत आहे. शिवाय, स्वत: कोहली धाव बनविण्यात उत्सुक असेल, कारण पुढे आफ्रिका आण आॅस्टे्रलियासारखे अत्यंत महत्त्व दौरे आहेत. तसेच, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सातत्य असणे भारतासाठी गरजेचे असेल.
दुसरीकडे, कोहली आणि कुंबळे यांची विचारसरणी व आता कोहली आणि शास्त्री यांच्यात खूप तफावत असेल. तसेच, पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष कोहली - शास्त्री या जोडीकडे असेल. याआधी जी कामगिरी केलेली, ती एक - दीड वर्षापूर्वीची होती आणि ती आता विसरून जायला पाहिजे. आता नवी इनिंग सुरू झाली आहे. ही पार्टनरशीप नक्कीच जुनी आहे, पण आव्हानं मात्र नवी आहेत.