ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 05:10 AM2020-03-11T05:10:57+5:302020-03-11T05:11:14+5:30

कोरोना व्हायरसच्या सावटाखाली आघाडीचे बॅडमिंटनपटू सज्ज

All England Championships: India's eye on Saina, Sindhu | ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर

ऑल इंग्लंड अजिंक्यपद : भारताची मदार सायना, सिंधू यांच्यावर

Next

बर्मिंगहॅम : कोरोना व्हायरसच्या सावटाखाली बुधवारपासून सुरू होत असलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची मदार पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्टार खेळाडूंवर असेल. यंदाच्या मोसमातील ही पहिलीच सुपर १००० स्पर्धा असून, इंग्लंडमध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे याआधीच जर्मन ओपन स्पर्धा रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे या कारणामुळेच एच. एस. प्रणॉय आणि चिराग शेट्टी-सात्त्विक रंकिरेड्डी यांसारख्या भारताच्या काही आघाडीच्या खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला एकूण १२ हजार मानांकन गुण मिळणार असून, आॅलिम्पिक पात्रतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या या स्पर्धेत जगभरातील आघाडीचे खेळाडू सहभागी होत आहेत.

भारताकडून सिंधूचा आॅलिम्पिक प्रवेश निश्चित आहे; मात्र असे असले तरी पहिल्यांदा ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्याचा तिचा प्रयत्न आहे. गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकलेल्या सिंधूला आतापर्यंत आॅल इंग्लंड स्पर्धा जिंकण्यात यश आलेले नाही. त्याचप्रमाणे, ‘फुलराणी’ सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांचाही अव्वल १६ क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याचा प्रयत्न असेल. गेल्या काही स्पर्धांमध्ये खालावलेली कामगिरी मागे टाकून श्रीकांत नव्याने आपली छाप पाडण्यास उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)

सायनाची सुरुवात आव्हानात्मक
आॅलिम्पिक पात्रतेसाठी मानांकन गुणांची मोठी आवश्यकता असलेल्या सायना नेहवालला सलामीला जपानच्या अकाने यामागुचीच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. तसेच पुरुषांमध्ये श्रीकांतला पहिल्या फेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग याच्याविरुद्ध खेळावे लागेल. पारुपल्ली कश्यप इंडोनेशियाच्या शेसार हिरेनविरुद्ध सलामीला खेळेल. भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनकडेही सर्वांचे लक्ष असून, त्याच्यापुढे सलामीच्या फेरीत हाँगकाँगच्या ली चियुकचे आव्हान असेल.

या स्पर्धेत भारतासाठी अखेरचे विजेतेपद विद्यमान राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी २००१ साली जिंकले होते. तसेच २०१५ साली सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०१८ साली सिंधूला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या बेइवेन झांगकडून पराभवाचा धक्का बसला होता. याशिवाय एकाही भारतीय खेळाडूला अद्याप या स्पर्धेत आपली छाप पाडण्यात यश आलेले नाही.

Web Title: All England Championships: India's eye on Saina, Sindhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.