चारही संघ तुल्यबळ
By admin | Published: May 16, 2017 01:31 AM2017-05-16T01:31:34+5:302017-05-16T01:31:34+5:30
गेल्या वर्षीचा उपविजेता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि बाद फेरीसाठी पात्र ठरलेला गुजरात लायन्स संघ यंदाच्या पर्वात मात्र जेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नव्हते.
- सौरभ गांगुली लिहितात...
गेल्या वर्षीचा उपविजेता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि बाद फेरीसाठी पात्र ठरलेला गुजरात लायन्स संघ यंदाच्या पर्वात मात्र जेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नव्हते. यंदाचे वर्ष त्यांच्यासाठी निराशाजनक ठरले. या दोन्ही संघांना स्थैर्यच मिळाले नाही. अखेरची लढत किंग्ज इलेव्हन संघासाठी निराशाजनक ठरली. एकाही खेळाडूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ‘वीरूपाजी’ निराश दिसत होता. सर्वोत्तम संघ अंतिम चारसाठी पात्र ठरले आणि यापैकी एक संघ चॅम्पियन ठरणार आहे. चारही संघ त्यांचा दिवस असेल तर तो संघ बाजी मारण्यास सक्षम आहे. त्यामुळे कुणी एक संघ दावेदार आहे, असे म्हणता येणार नाही.
गेल्या वर्षीचा चॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद संघ स्वत:ला नशीबवान समजत असेल. कारण पावसामुळे रद्द झालेल्या लढतीतून मिळालेल्या गुणाच्या मदतीने त्यांना आगेकूच करता आली. डेव्हिड वॉर्नरने जबाबदारी स्वीकारीत संघाचे नेतृत्व केले. हैदराबाद संघ समतोल आहे. या संघात अनुभवी युवराज, शिखर धवन, केन विल्यम्सन यांच्यासह युवा खेळाडू विजय शंकर यांचा समावेश आहे. गोलंदाजी विभागातही हैदराबाद संघात भुवी व आशिष नेहरा यांच्यासह अफगाणिस्तानचा राशिद खान किंवा युवा सिराज यांचा समावेश आहे. खेळपट्टीचे स्वरूप बघितल्यानंतर योग्य खेळाडूंची निवड करण्याची गरज असून त्यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करायला हवी. सनरायझर्स संघ कोलकाता नाईट रायडर्ससोबत खेळणार आहे आणि उभय संघांसाठी अंतिम फेरी गाठण्यासाठी ही पहिली पायरी आहे. उभय संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांची लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती असते आणि त्यामुळे या लढतीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. या लढतीतील चूक संघासाठी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यास पुरेशी ठरणार आहे. केकेआरतर्फे गौतम गंभीर संघाला चांगली सुरुवात करून देईल आणि परिस्थितीवर नियंत्रण राखेल, असे मला वाटते. हैदराबाद व कोलकाता संघांच्या तुलनेत मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांची स्थिती चांगली आहे. त्यांच्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे, तर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. पराभूत संघाला हैदराबाद-कोलकाता यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या संघासोबत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलमध्ये साखळी फेरीअखेर अव्वल दोन स्थानांवर राहणाऱ्या संघांना हा लाभ मिळतो. सुरुवातीला भासत होता त्या तुलनेत पुणे संघात मोठी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. स्मिथ, रहाणे, त्रिपाठी, मनोज तिवारी, स्टोक्स आणि धोनी यांच्या समावेशामुळे संघाची फलंदाजीची बाजू मजबूत भासत आहे. कर्णधाराला केवळ गोलंदाजांचा योग्य वापर करावा लागणार आहे. बेन स्टोक्सची उणीव कशी भरून काढायची, हे कर्णधार स्मिथपुढे मोठे आव्हान आहे. कारण स्टोक्स उर्वरित लढतींसाठी उपलब्ध नाही. पुणे संघ त्याची उणीव कशी भरून काढतो, याबाबत उत्सुकता आहे. पाच नव्या खेळाडूंसह कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सहज विजयाची नोंद करणाऱ्या संघाविरुद्ध पुणे संघाला खेळायचे आहे. मुंबई संघ सुरुवातीपासून चांगला खेळत होता व साखळी फेरीअखेर गुणतालिकेत अव्वल स्थानासाठी पात्र होता. त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे, फलंदाजीमध्ये खोली आहे आणि फलंदाज आक्रमक खेळी करण्यासही सक्षम आहेत. पण त्यांच्यासाठीही काही दिवस वाईट असू शकतात, हे विसरता येणार नाही.(गेमप्लान)