स्मिथला बाद करण्याच्या सर्व योजना अपयशी
By admin | Published: March 23, 2017 11:26 PM2017-03-23T23:26:22+5:302017-03-23T23:26:22+5:30
भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानची मालिका मैदानासोबत मैदानाबाहेरही खेळली जात आहे. आॅस्ट्रेलियन आजी-माजी क्रिकेटपटू भारतीय संघावर शाब्दिक हल्ले करीत आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानची मालिका मैदानासोबत मैदानाबाहेरही खेळली जात आहे. आॅस्ट्रेलियन आजी-माजी क्रिकेटपटू भारतीय संघावर शाब्दिक हल्ले करीत आहेत. या वाक्युद्धामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेत वादाची स्थिती निर्माण झाली आहे. धरमशालामध्ये खेळल्या जाणाऱ्या निर्णायक कसोटीपूर्वी वाक् युद्धाने अधिक जोर धरला आहे.
आॅस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी भारतीय कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केले आहे. कोहली भारतीय संघाचा आधारस्तंभ असल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठविली आहे. कोहलीचे मनोधैर्य खचले, तर भारतीय संघाला पराभूत करण्यास अधिक वेळ लागणार नाही, याची आॅस्ट्रेलियन संघाला चांगली कल्पना आहे. पण, टीका करण्यात आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल या सर्वांच्या पुढे आहेत. त्यांनी केवळ कोहलीच नाही, तर भारतीय संघाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इयान चॅपेल यांच्या मते, आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथला या कसोटी मालिकेत बाद करण्याच्या भारताच्या सर्व योजना संपल्या आहेत. या ४ कसोटी मालिकेत स्मिथ ३७१ धावा काढून सर्वाधिक धावा फटकावणारा खेळाडू आहे. तीन सामन्यांत त्याने आतापर्यंत दोन शतके ठोकली आहे. त्यामुळे भारतीय संघ स्मिथला बाद करण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे स्पष्ट होते, असेही चॅपेलने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)