अष्टपैलू बेनचा तडाखेबंदशतकी ‘स्ट्रोक’
By admin | Published: May 2, 2017 01:32 AM2017-05-02T01:32:54+5:302017-05-02T01:32:54+5:30
जयदेवे उनाडकट (३/२९), इम्रान ताहिर (३/२७) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सने ६३ चेंडूत ७ चौकार व ६ षटकार
शिवाजी गोरे / पुणे
जयदेवे उनाडकट (३/२९), इम्रान ताहिर (३/२७) यांच्या भेदक गोलंदाजीनंतर बेन स्टोक्सने ६३ चेंडूत ७ चौकार व ६ षटकार ठोकून झळकावलेले आक्रमक नाबाद शतक व महेंद्रसिंह धोनीची महत्वपूर्ण खेळी याजोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटने गुजरात लायन्सचा ५ विकेट्सने पराभव केला.
एमसीए स्टेडियमवर झालेल्या लढतीत पुणे संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गूजरात लायन्सने दिलेल्या १६२ धावा आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या पुणे संघाची सुरूवात खराब झाली. प्रदिप सागवानच्या पहिल्याच षटकात पुण्याचे तीन भरवशाचे फलंदाज फलकावर १० धावा असताना तंबूत परतले. अजिंक्य रहाणे ४ धावा काढून पायचीत झाला. कर्णधार स्टिव्ह स्मिथ सुध्दा ४ धावा काढून अंकित सोनीच्या हाती झेलबाद झाला. पुढच्या षटकात मनोज तिवारी शून्यावर बसिल थम्पीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पुण्याची अवस्था बिकट असतानाच सहाव्या षटकात राहूल त्रिपाठीला ६ धावांवर फिंचने धावबाद केले. ४ बाद ४२ अशी परिस्थिती असताना बेन स्टोक्स आणि महेंद्रसिंह धोनी मैदानावर होते. त्यांना संघाची पडझड थांबविली, पण दुसरीकडे धावफलक सुध्दा हालता ठेवला. एकीकडे बेन फटकेबाजी करीत असताना धोनी त्याला साथ देत होता. बेनने ३८ चेंडूत ३ चौकार व ३ षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्सच्या जोरावर पुण्याने एक चेंडू राखून ५ बाद १६७ धावा काढून विजय निश्चित केला.
१७ व्या षटकात थम्पीच्या गोलंदाजीवर धोनीने मिड आॅफला उंच मारलेला चेंडू सीमा रेषेवर मॅक्क्युलमने सहज झेल घेतला. त्याने २६ धावा काढताना३३ चेंडूत १ चौकार व १ षटकार मारला. बेन आरि धोनीने पाचव्या विकेटसाठी ७६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर बेनने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेण्यास सुरूवात केली. त्याने आपले शतक ६१ चेंडूत ७ चौकार व ६ षटकात मारून पूर्ण केले. दुसरीकडे ख्रिस्टियनने ८ चेंडूत १ चौकार व १ षटकार मारून नाबाद १७ धावा केल्या. गुजरातकडून सांगवान व थम्पीने प्रत्येकी दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या डावाची सुरूवात इशान किशन आणि ब्रॅडन मॅक्क्युलम यांनीकेली. जयदेव उनाडकटच्या पहिल्याच षटकात एक धाव किशनने काढल्यानंतर मॅक्क्युलमने जयदेवला एक चौकार व एक षटकार ठोकला. गुजरातच्या ५० धावा ५.३ षटकात लागल्या, त्यावेळी किशन ३२ तर मॅक्क्युलम २३ धावांवर खेळत होते. स्टिव्ह स्मिथने पाचवे षटक टाकण्यासाठी इम्रान ताहिरला आणले आणि त्याने किशनला सुंदर वॉशिंग्टनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कर्णधार सुरेश रैनाही जास्त वेळ टिकला नाही. आठव्या षटकात ताहिरच्या गोलंदाजीवर रहाणेने रैनाला ८ धावांवर धावबाद केले. रैना बाद झाल्यावर फिंचला सुध्दा ताहिरने १३ धावांवर स्व:ताच्या गोलंदाजीवर झेल घेऊन बाद केले. या षटकात ताहिरने दोन विकेट गेतल्या. दिनेश कार्तिक (२९) आणि रविंद्र जडेजा (१९) हे दोघेच काही वेळ टिकून राहिले. जडेजाला क्रिस्टियनने बाद केल्यानंतर जेम्स फॉल्कनर (६), प्रदिप सांगवान (१), अंकित सोनी (०) लवकर बाद झाले. गुजरातचा डाव १९.५ षटकात १६१ धावात संपुष्टात आला.
मुख्य खेळपट्टीचा वापर....
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या मैदानावर असलेल्या एकूण १५ खेळपट्टया पैकी रविवारी गुजरातविरूध्द मध्यभागी असलेली ८ नंबरची मुख्य खेळपट्टी वापरण्यात आली. या मैदानावर झालेल्या पाच लढतीसाठी ७ व ९ क्रमांकाच्या खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आला होता. या खेळपट्टीवर या आयपीएल १० सत्रात एकही सामना खेळविण्यात आला नव्हता.
संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : १९.५ षटकात सर्वबाद १६१ धावा (ब्रेंडन मॅक्क्युलम ४५, इशान किशस ३१, दिनेश कार्तिक २९; इम्रान ताहिर ३/२७,
जयदेव उनाडकट ३/२९) पराभूत वि.
रायझिंग पुणे सुपरजायंट : १९.५ षटकात
५ बाद १६७ धावा (बेन स्टोक्स नाबाद १०३, महेंद्रसिंग धोनी २६; बसिल थम्पी २/३५,
प्रदिप सांगवान २/३८)