महिलांच्या सर्व क्रिकेट सामन्यांचे प्रसारण व्हायला पाहिजे : मिताली
By Admin | Published: March 7, 2016 03:21 AM2016-03-07T03:21:28+5:302016-03-07T03:21:28+5:30
महिला संघांच्या सामन्यांचे नियमितपणे टीव्हीवर प्रसारण झाले तर महिला क्रिकेटपटू टेनिसस्टार सानिया मिर्झा व बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्याप्रमाणे लोकप्रिय होतील
नवी दिल्ली : महिला संघांच्या सामन्यांचे नियमितपणे टीव्हीवर प्रसारण झाले तर महिला क्रिकेटपटू टेनिसस्टार सानिया मिर्झा व बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्याप्रमाणे लोकप्रिय होतील, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केले.
भारतीय महिला संघांची अलीकडच्या कालावधीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतीय संघाने आॅस्ट्रेलियात जानेवारी महिन्यात टी-२० मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मायदेशात वन-डे व टी-२० सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा पराभव केला.
महिला क्रिकेटपटूंना सानिया व सायना यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळू शकते का, याबाबत बोलताना मिताली म्हणाली, ‘‘जर आमच्या लढतींचे टीव्हीवर प्रसारण झाले तर तशी शक्यता नाकारता येत
नाही. वैयक्तिक विचार करता महिला क्रिकेटपटूंना अनेक
प्रायोजक लाभतील. केवळ
काही सामन्यांचे प्रसारण झाले तर तुमच्या खेळाचे कुणी अनुकरण करणार नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत प्रसारण झाले नाही.
या मालिकेतही आमची
कामगिरी उल्लेखनीय ठरली. परिस्थिती जर अशीच राहिली
तर सुधारणा होण्याची शक्यता
कमी आहे.’’
विश्व टी-२० स्पर्धेच्यानिमित्ताने भारतात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची चांगली संधी आहे, असेही महिला संघाची कर्णधार मिताली म्हणाली.(वृत्तसंस्था)मितालीने सांगितले, ‘‘भारतीय संघ चांगल्या फॉर्मात असून सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघाकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. बीसीसीआयकडून महिला क्रिकेटपटूंना
बिग बॅशसारख्या
टी-२० स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळायला हवी.’’
बिग बॅशसारख्या
स्पर्धांमुळे सर्वोत्तम खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे बरेच काही शिकायला मिळेल. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर व वेदा कृष्णमूर्ती यांच्यासारख्या युवा खेळाडूंना क्रिकेटर म्हणून परिपक्व होण्याची संधी मिळेल, असेही मिताली म्हणाली.
आमच्यासाठी भारतात आयपीएलसारखी स्पर्धा नाही. त्यामुळे आॅस्ट्रेलिया व इंग्लंडला आम्ही त्यांच्या स्पर्धेत खेळावे असे वाटत असेल तर बीसीसीआयकडून आम्हाला समर्थन मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे पुढच्या विश्वकप टी-२० स्पर्धेत भारतीय संघ वेगळा भासेल, असा विश्वास मितालीने या वेळी व्यक्त केला.