लैंगिक शोषणाचा आरोप
By admin | Published: February 4, 2016 03:45 AM2016-02-04T03:45:35+5:302016-02-04T03:45:35+5:30
भारतीय हॉकी संघाला रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून देणारा राष्ट्रीय संघाचा कर्णधार सरदारसिंगवर त्याच्या ब्रिटिश वाग्दत्त वधूने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे
चंदीगड : भारतीय हॉकी संघाला रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवून देणारा राष्ट्रीय संघाचा कर्णधार सरदारसिंगवर त्याच्या ब्रिटिश वाग्दत्त वधूने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लुधियाना पोलिसांकडे याबाबत लिखित तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस विभागातर्फे सरदारविरुद्ध अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
२०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या सरदारने आपल्या नेतृत्वाखाली इंचियोन आशियाई स्पर्धेत राष्ट्रीय संघाला सुवर्णपदक मिळवून देताना रिओ आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करून दिले होते. २९ वर्षीय मिडफिल्डर हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे.
राष्ट्रीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार आणि भारतीय पण मूळची ब्रिटिश महिला यांचा २०१२ मध्ये साखरपुडा झाल्याचे वृत्त झळकले होते. या दोघांंना त्यावेळी सोबत बघितले होते. इंग्लंडच्या अंडर-१९ हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महिलेने मंगळवारी पोलिसांना दिलेल्या लिखित तक्रारीमध्ये सरदारवर लैंगिक छेडखानीचा आरोप केला आहे. सध्या आम्ही तक्रारीची चौकशी करीत असून सरदारवर एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असे लुधियाना पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
पीडित महिला खेळाडूने सरदारसिंगवर विवाहास नकार देण्यासोबत मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या शोषण केले असल्याचे आरोप केले आहेत. महिलेने म्हटले आहे की, ‘गर्भपात करण्यास भाग पाडल्यापासून सरदार मला टाळत आहे. त्याने मानसिकदृष्ट्या माझे शोषण केले असून आता विवाहास नकार देत आहे. मी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून मला न्याय मिळेल, असा विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)जालंधर : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार
सरदारसिंगविरुद्ध भारतीय पण मूळच्या ब्रिटिश
महिलेद्वारे लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी लुधियाना पोलीस आयुक्तांनी बुधवारी
एक विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. ही
समिती तीन दिवसांमध्ये आपला अहवाल सादर
करणार आहे.
लुधियानाचे पोलीस आयुक्त परमराजसिंग उमरानंगल यांनी सांगितले की, ‘सरदार प्रकरणात चौकशीसाठी एक विशेष समिती गठित करण्यात आली आहे. या प्रकरणात ही समिती चौकशी करणार असून, आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस उपायुक्त सतबीरसिंग करणार असून, त्यात एक सहायक पोलीस आयुक्त आणि एसएचओचा समावेश आहे.’
२१ वर्षीय महिलेने आश्चर्यचकित करणारा आरोप करताना सरदारसिंगची वाग्दत्त वधू असल्याचा दावा केला आहे. महिलेने म्हटले आहे की,‘माझी व सरदारसिंगची पहिली भेट २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकदरम्यान झाली होती. तेव्हापासून आमचे संबंध आहेत. सरदारने विवाहाचे आश्वासन देताना माझ्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केले होते. २०१५ मध्ये त्याने सक्तीने मला गर्भपात करण्यास भाग पाडले. तेव्हापासून तो माझ्या संपर्कात नाही.’