पदक हुकले असले, तरी मुलीचा गर्व वाटतो - शिवाजी बाबर
By admin | Published: August 17, 2016 04:00 AM2016-08-17T04:00:24+5:302016-08-17T04:00:24+5:30
ललिता पदकापासून वंचित राहिली याची खंत आहेच; पण ज्या परिस्थितीतून तिने आॅलिम्पिकपर्यंत झेप घेतली त्याबबत आम्हाला तिचा गर्व वाटतो
पुणे : ‘‘ललिता पदकापासून वंचित राहिली याची खंत आहेच; पण ज्या परिस्थितीतून तिने आॅलिम्पिकपर्यंत झेप घेतली त्याबबत आम्हाला तिचा गर्व वाटतो,’’ अशा शब्दांत रिओ आॅलिम्पिकमध्ये स्टीपलपेस शर्यतीतील भारताची धावपटू ललिता बाबर हिचे तिच्या आई-वडिलांनी कौतुक केले.
ललिताचे वडिल शिवाजी बाबर यांनी सांगितले, की ललिता भारतासाठी आॅलिम्पिक खेळली, याचा आम्हाला गर्व आहे. तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. तिने ज्या प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला त्याबाबत आम्ही दु:खी आहोत. मात्र तरीही तिला जिंकण्याचा विश्वास होता. तसेच, ती पदक जिंकू शकली नसली, तरीही यापुढे आपले सर्वोत्तम प्रदर्शन करीत राहील, असा विश्वासही या वेळी शिवाजी बाबर यांनी व्यक्त केला.
साताऱ्याच्या माण तालुक्याची असलेली ललिता ‘माणदेशी एक्स्प्रेस’ नावाने ओळखली जाते. तिचे वडील ट्रकचालक असून आर्थिकदृष्ट्या त्यांची परिस्थिती कमजोर आहे. शिवाजी बाबर यांनी सांगितले, की येथील शैक्षणिक असुविधा आणि पर्वतीय विभाग असल्याने ललिताने अनेक समस्यांना तोंड दिले आहे. ती गावातील शाळेमध्ये अभ्यास करीत असे. त्याचप्रमाणे ललिताच्या गावातील शालेय शिक्षक मुगुट पटोले यांनी सांगितले, की ललिताला खो-खो खेळाची आवड आहे; मात्र नंतर तिने लांब पल्ल्याची धावपटू म्हणून नाव कमावले. ती शेतात आई-वडिलांना मदत करायची आणि शाळेत पोहोचण्यास उशीर होऊ नये म्हणून धावत जायची. यामुळेच ती उत्कृष्ट धावपटू बनली. (वृत्तसंस्था)