अमेरिकन बॅडमिंटन : अजय जयराम व आनंद पवार उपांत्यपुर्व फेरीत भिडणार
By admin | Published: July 8, 2016 05:39 PM2016-07-08T17:39:10+5:302016-07-08T17:39:10+5:30
चौथ्या मानांकीत अजय जयराम आणि बिगरमानांकीत आनंद पवार यांनी चमकदार कामगिरी करताना अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.
अमेरिकन बॅडमिंटन : एचएस प्रणय, बी. साई प्रणीत, तन्वी लाड स्पर्धेबाहेर
कॅलिफोर्निया : चौथ्या मानांकीत अजय जयराम आणि बिगरमानांकीत आनंद पवार यांनी चमकदार कामगिरी करताना अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे उपांत्यपुर्व फेरीमध्ये हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर लढणार असल्याने या लढतीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कसलेल्या जयरामने आपल्या लौकिकासह आक्रमक खेळ करताना पोर्तुगालच्या पेड्रो मार्टिसचे आव्हान सरळ गेममध्ये परतावले. केवळ ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवताना जयरामने २१-११, २१-१५ अशी सहज बाजी मारली. त्याचवेळी दुसरीकडे आनंदने आपलाच देशबांधव प्रतुल जोशीचे आव्हान ३५ मिनिटांमध्ये २१-१०, २१-१३ असे संपुष्टात आणले.
एकीकडे या दोन्ही खेळाडूंनी विजयी कूच केली असताना दुसरीकडे मात्र भारताच्या अन्य खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. पाचवा मानांकीत एचएस प्रणय, सहावा मानांकीत बी. साई प्रणीत आणि महिलांमध्ये तन्वी लाड यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. कोरियाच्या ली ह्यून याने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना प्रणयला २५-२३, २३-२१ असे नमवले. त्याचवेळी तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत प्रणीतला जपानच्या काजूमासा सकईविरुध्द २१-१३, १७-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत तन्वीचा अमेरिकेच्या बेईवेन झांगविरुद्ध १७-२१, १५-२१ असा पराभव झाला.
दुसऱ्या बाजूला पुरुष दुहेरीमध्ये भारताची अव्वल जोडी मनु अत्री - बी. सुमीत रेड्डी यांनी अपेक्षित आगेकूच करताना जपानच्या केन्या मित्सुहाशी - यूता वातानबी यांना २३-२१, २१-१३ असे नमवले. यासह भारतीय जोडीने उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. तर महिला दुहेरीत जकामपुडी मेघना - एस. पुर्वीशा यांनी शानदार विजय मिळवताना अमेरिकेच्या एरियल ली - सिडनी ली यांना २१-१६, २१-६ असे लोळवून उपांत्यपुर्व फेरी गाठली.