अमेरिकन ओपन बॅडमिंटन : भारतीय शटलर्सचा दबदबा...
By admin | Published: July 7, 2016 05:39 PM2016-07-07T17:39:12+5:302016-07-07T17:39:12+5:30
कॅनडा ओपनमध्ये भारतीयांनी दबदबा राखल्यानंतर सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपनमध्येही वर्चस्व राखताना आपली विजयी घोडदौड कायम राखली. भारताच्या एकूण ६ खेळाडूंनी उप - उपांत्यपुर्व फेरीत धडक
ऑनलाइन लोकमत
एल मोंटे, दि. ७ : कॅनडा ओपनमध्ये भारतीयांनी दबदबा राखल्यानंतर सध्या सुरु असलेल्या अमेरिकन ओपनमध्येही वर्चस्व राखताना आपली विजयी घोडदौड कायम राखली. भारताच्या एकूण ६ खेळाडूंनी उप - उपांत्यपुर्व फेरीत धडक मारताना लक्षवेधी कामगिरी केली आहे.
पुरुष एकेरीत सहाव्या मानांकीत कॅनडा ओपन विजेत्या साई प्रणीतने आपल्या लौकिकानुसार दिमाखदार आगेकूच करताना कॅनडाच्या के. बी. संकीर्तचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडवला. उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रणीतचा सामना जपानच्या कुजुमासा सकाई विरुध्द होईल. सकाईने भारताच्याच आर.एम.व्ही. गुरुसाईदत्तचा २१-१७, २१-१२ असा पाडाव करुन विजय मिळवला.
पाचव्या मानांकीत एच. एस. प्रणयने देखील अपेक्षित आगेकूच करताना आयर्लंडच्या जोशुआ मॅगीचे आव्हान २१-९, २१-८ असे परतावले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात प्रणयने मॅगीला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. पुढील फेरीत कॅनडा ओपनचा उपविजेता कोरियाच्या ली ह्यून इलचे तगडे आव्हान प्रणयसमोर असेल.
युवा खेळाडू प्रतुल जोशीने देखील चमकदार कामगिरी करताना झेक प्रजासत्ताकच्या मिलान लुडीकचे कडवे आव्हान २१-१८, २१-१३ असे संपुष्टात आणले. उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रतुल भारताच्याच आनंद पवारविरुद्ध भिडेल. आनंदने आॅस्ट्रीयाच्या डेव्हीड ओबरनोस्टरचा २१-१२ २१-९ असा दणदणीत पराभव केला. त्याचप्रमाणे चौथ्या मानांकीत अजय जयरामने एस्टोनियाच्या राऊल मस्टला २१-१४, २१-९ असे लोळवून उप-उपांत्यपुर्व फेरी गाठली.