अमेरिकन ओपन बॅडमिंटन : सहा भारतीय दुसऱ्या फेरीत
By admin | Published: July 6, 2016 06:11 PM2016-07-06T18:11:20+5:302016-07-06T18:11:20+5:30
कॅनडा ओपन स्पर्धेत विजेतेपद जिंकणारा बी. साई प्रणीतसह एच. एस. प्रणय, आरएमव्ही गुरुसाईदत्त, प्रतुल जोशी, आनंद पवार यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अमेरिकन
ऑनलाइन लोकमत
एल मोंटे, दि. ६ : कॅनडा ओपन स्पर्धेत विजेतेपद जिंकणारा बी. साई प्रणीतसह एच. एस. प्रणय, आरएमव्ही गुरुसाईदत्त, प्रतुल जोशी, आनंद पवार यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या बी. साई प्रणीतने स्वीडनच्या हेनरी हुर्स्केनेनला सरळ दोन गेममध्ये २१-१३, २१-१२ गुणांनी पराभूत केले. प्रणीतचा पुढील सामना कॅनडाच्या बी. आर. संकिर्थविरुद्ध होईल. दुसरीकडे एच. एस. प्रणयने मेरिकेच्या केल्विन लीनचा २१-७, २१-६ गुणांनी फडशा पाडत दुसऱ्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. प्रणयला पुढच्या फेरीत आयर्लंडच्या जोशूआ मॅगीचे आव्हान असेल. भारताचा आएमव्ही गुरुसाईदत्तने स्थानिक खेळाडू फिलीप जापला २१-८, २१-१३ गुणांनी नमविले.
गुरुसाईदत्तचा पुढील सामना जपानच्या काजुमासा सकाइविरुद्ध होणार आहे. युवा खेळाडू प्रतुल जोशीने कॅनडाच्या केव्हिन बार्कमॅनला २१-१३, २१-१३ असे पराभूत केले. आनंद पवारने डेन्मार्कच्या पिडर एस ला २१-१७, २१-७ असा धुव्वा उडवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. आनंदचा पुढील सामना आॅस्ट्रियाच्या डेव्हिड ओबेरनोस्टररविरुद्ध होईल. भारताच्या हर्षिल दाणीला मात्र इस्त्राईलच्या मिशा जिल्बरमॅनकडून १८-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला