अमेरिका विश्वविजेती...
By Admin | Published: July 7, 2015 12:44 AM2015-07-07T00:44:56+5:302015-07-07T00:44:56+5:30
अमेरिकेने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या जपानला ५-२ असे लोळवून तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला.
वेंकॉवर : स्ट्रायकर कार्ली लॉइडने केलेल्या धमाकेदार हॅट्ट्रिकच्या जोरावर अमेरिकेने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या जपानला ५-२ असे लोळवून तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. विशेष म्हणजे विश्वचषक अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवणारी कार्ली ही पहिली महिला फुटबॉलपटू ठरली.
१९९१ व १९९९ सालानंतर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवणारी अमेरिका तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरली. त्याचबरोबर २०११ साली झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये जपानविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपादेखील अमेरिकेने काढला.
वेगवान व आक्रमक सुरुवात करताना अमेरिकेने सामन्यावर वर्चस्व राखण्यास सुरुवात केली. या वेळी कार्लीने जबरदस्त खेळ करताना तिसऱ्या व पाचव्या मिनिटाला वेगवान गोल करताना अमेरिकेला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर लॉरेन हॉलिडेने १४व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी आणखी मजबूत केली. तर दोन मिनिटांनी पुन्हा एकदा कार्लीने आपला जलवा दाखवताना एक गोल केला आणि १६व्या मिनिटालाच अमेरिकेची आघाडी ४-० अशी एकतर्फी वाढवताना सामना पूर्णपणे संघाच्या दिशेने फिरवला.
या धडाक्यापुढे पूर्णपणे हतबल झालेल्या जपानच्या खेळाडूंचे सामन्यावरील नियंत्रण सुटू लागले होते. दरम्यान, २७व्या मिनिटाला यूकी ओगिमीने गोल करून संघाची पिछाडी १-४ अशी कमी केली. तर मध्यंतरानंतर जोरदार प्रत्युत्तर देताना ५२व्या मिनिटाला जपानने ज्युली जॉन्सनने केलेल्या स्वयंगोलाच्या जोरावर पिछाडी २-४ अशी कमी केली. त्याच वेळी दोन मिनिटांनंतर ताबिन हीथने अप्रतिम गोल करून अमेरिकेला ५-२ अशी आघाडी मिळवून देत जपानच्या आव्हानातली हवाच काढली.
---------------
भविष्यवाणीने केला ‘पोपट’ : महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेते जपान आपल्याच देशाच्या ओलिविया नामक पोपटाच्या भविष्यवाणीत इतके गुंतले, की त्यांना अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या भविष्यवाणीच्या नादात काहीसे गाफील राहिल्यानंतर जपान आपल्या सर्वोत्कृष्ट खेळापासून दूर राहिले. जपानचा दहा वर्षीय पोपट ओलावियाने कॅनडा येथे झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत सलग अचूक भविष्यवाणींचा धडाका लावला होता.
-----------
निश्चित ही कामगिरी अत्यंत आनंददायी आहे. संघाला विश्वविजेतेपद मिळवून देण्याचा आनंद आहेच. परंतु, याहून अधिक मोठी कामगिरी करण्याची माझी इच्छा असून, त्यादृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करेल.
- कार्ली लॉइड, कर्णधार-अमेरिका