जागतिक बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल उपांत्य फेरीत, भारताचे पदक निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:23 AM2019-09-19T04:23:30+5:302019-09-19T04:23:32+5:30
आशियाई सुवर्ण विजेता अमित पंघालने (५२ किलो) बुधवारी विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
एकातेरिनबर्ग : आशियाई सुवर्ण विजेता अमित पंघालने (५२ किलो) बुधवारी विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी अन्य लढतीत मनीष कौशिक (६३ किलो) यानेही शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. यासोबतच भारताचे दोन पदक निश्चित झाली आहेत.
आशियाई चॅम्पियन आणि दुसरा मानांकित पंघालने फिलिपिन्सचा कार्लो पालाम याच्यावर ४-१ ने विजय नोंदविला. पंघालने याआधी पालामवर मागच्यावर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतही विजय नोंदविला होता. उपांत्य लढतीत हरियाणाच्या पंघालची गाठ कझाखस्तानच्या साकेन बिबोसिनोवविरुद्ध पडेल. बिबोसिनोवने उपांत्यपूर्व फेरीत अर्मेननियाचा युरोपियन सुवर्ण विजेता आर्टर होवहानिशयान याला नमविले. पंघालने गतवर्षी विश्व चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. ४९ किलो गटात त्याला गत चॅम्पियन हसानबॉय दुस्मातोवकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
राष्ट्रकुल रौप्य विजेता कौशिकने एकतर्फी सामन्यात ब्राझीलच्या वाँडरसन डि ओलिवेरा याचा ५-० असा धुव्वा उडवला. कौशिकने मोक्याच्यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. पुढील फेरीत त्याची लढत क्यूबाचा अव्वल मानांकीत अँडी गोमेझ क्रूझविरुद्ध होईल. ९१ किलो वजनी गटात संजीतचा इक्वाडोरच्या ज्युलियो कास्टिलो टोरेसविरुद्ध १-४ असा पराभव झाला.