अमित पंघालची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 02:21 AM2019-05-01T02:21:55+5:302019-05-01T06:11:48+5:30
भारतीय बॉक्सिंग महासंघाने मंगळवारी आशियन गेम्स व आशियन चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता अमित पंघाल व विश्व चॅम्पियनशिप २०१७ चा कांस्यपदक विजेता गौरव बिधुडी यांच्या नावांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे
नवी दिल्ली : भारतीयबॉक्सिंग महासंघाने मंगळवारी आशियन गेम्स व आशियन चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता अमित पंघाल व विश्व चॅम्पियनशिप २०१७ चा कांस्यपदक विजेता गौरव बिधुडी यांच्या नावांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. अमितने जकार्तामध्ये आशियन गेम्समध्ये ४९ किलो वजनगटात उज्बेकिस्तानचा विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन हसनबाय दुसमातोव्हचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले होते. गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी अमितच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
अमितच्या नावावर विचार करण्यात आला नव्हता. कारण तो २०१२ मध्ये डोप चाचणीत अपयशी ठरला होता. त्यासाठी त्याच्यावर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती. बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंग यांनी सत्कार सोहळ्यादरम्यान सांगितले की, ‘आम्ही पुन्हा अमितच्या नावाची शिफारस केली असून यावेळी त्याचा विचार होईल, असा विश्वास आहे.’ पंघाल म्हणाला, ‘डोप चाचणीमध्ये जे एनाबोलिक स्टेरायड मिळाले होते ते उपचारासाठी अजानतेपणी घेतले होते.’
नीरज चोप्राची छाप
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने सर्वोच्च ‘खेलरत्न’ क्रीडा पुरस्कारासाठी आशियाई सुवर्ण विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या नावाची शिफारस केली आहे.