अमित समर्थ यांची सायकलवरून सुरु झाली भारत भ्रमंती, ग्रामीण खेळाडूंसाठी उभारणार निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 06:34 AM2021-02-16T06:34:16+5:302021-02-16T06:35:20+5:30
Amit Samarth's tour of India started on a bicycle : विशेष म्हणजे, या मोहिमेद्वारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे लक्ष्य समर्थ यांनी बाळगले आहे.
मुंबई : विविध लांबपल्ल्याच्या सायकल मोहीम गाजवून वेगळी ओळख निर्माण केलेले अनुभवी अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थ यांनी शनिवारी मुंबईतून भारत भ्रमंतीला सुरुवात केली. आगामी १४ दिवसांमध्ये सायकलद्वारे तब्बल सहा हजार किमी अंतर पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेद्वारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे लक्ष्य समर्थ यांनी बाळगले आहे.
‘राइड अॅॅक्रॉस इंडिया’ या मोहिमेंतर्गत ६ हजार किमी सायकल प्रवास करण्याचा संकल्प समर्थ यांनी केला आहे. १५ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथून या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेद्वारे समर्थ सुमारे ८५ शहरांना भेट देतील.
या संपूर्ण मोहिमेचे चित्रीकरण होणार असून ते गिनिज रेकॉर्डसाठीही पाठविले जाईल, असे या मोहिमेच्या आयोजकांनी सांगितले. या मोहिमेतून उभारण्यात येणारा निधी डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसास्थित लोकबिरादरी प्रकल्पाला दान करण्यात येईल. आदिवासी व दुर्गम भागातील खेळाडूंच्या विकासासाठी या निधीचा उपयोग होईल, अशी माहिती समर्थ यांनी दिली.
रेस अॅॅक्रॉस अमेरिका तसेच ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ ही जगातील अत्यंत खडतर रेस पूर्ण करणारे आशियातील एकमेव सायकलपटू समर्थ हे स्कॉट स्पोर्टस् इंडियाचे ब्रँड अॅॅम्बेसिडर आहेत. ‘मुंबईतून मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर दक्षिणेत चेन्नईच्या दिशेने कूच होईल. चेन्नईचा निरोप घेतल्यानंतर कोलकाताच्या दिशेने प्रवास सुरू होईल. त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पुन्हा मुंबईत येणार आहे. दररोज कमीतकमी विश्रांतीसह ४५० किमी अंतर पार करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. दक्षिण भारतातील उकाडा आणि उत्तर भारतातील कडाक्याची थंडी असा अनुभव या मोहिमेच्यानिमित्ताने येईल. हे आव्हान पेलण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे,’ असा विश्वास समर्थ यांनी व्यक्त केला.
शारीरिक क्षमता पाहणारी मोहीम
देशाच्या अनेक शहरांना वळसा घेत ६ हजार किमी सायकल प्रवासाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा समर्थ यांनी केला. समर्थ यांच्या या खडतर मोहिमेची तंतोतंत माहिती उपग्रहाच्या माध्यमातून मिळू शकेल. यासाठी विशेष ‘www.rideacrossindia.com’ हे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान अमित समर्थ यांच्या हृदयाची गती, शारीरिक क्षमता, हवामान, ऑक्सिजनचे प्रमाण आदींची माहिती ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर करण्यात येत आहे.