'निवृत्ती'च्या पोस्टनंतर पी.व्ही. सिंधूला दिल्या अमित शाह यांनी शुभेच्छा; सत्य समजताच डिलीट केलं ट्विट!
By स्वदेश घाणेकर | Published: November 3, 2020 04:12 PM2020-11-03T16:12:34+5:302020-11-03T16:12:53+5:30
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिनं सोमवारी चाहत्यांना धक्काच दिला. हैदराबादच्या या खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिनं 'Retire' हा शब्द वापरला
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिनं सोमवारी चाहत्यांना धक्काच दिला. हैदराबादच्या या खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिनं 'Retire' हा शब्द वापरला. तिनं केलेल्या भल्यामोठ्या पोस्टमध्ये डेन्मार्क ओपन ही अंतिम स्पर्धा आणि तिनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे, असे लिहिले. तिची ही पोस्ट थोड्याच वेळात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि चर्चेवर चर्चा रंगली. तिच्या या पोस्टनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी तिला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पण, ती निवृत्ती घेत नसल्याचे कळताच त्यांनी ते ट्विट डिलीट केलं.
''विशिष्ट कौशल्य आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाच्या जोरावर तिनं जागतिक बॅडमिंटनमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. तिनं देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तिचं विजेच्या वेगाने येणारा स्मॅश आता आपण मिस करू. पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा,''असं अमित शाह यांनि ट्विट केलं होतं. खरं तर सिंधूनं सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आलेल्या नकारात्मक बाबींना निवृत्त करण्याची पोस्ट लिहिली होती. पण, तिच्या पोस्टनं अनेकांचा गोंधळ उडाला.
''मला काय वाटतं हे मी स्पष्टपणे मनमोकळेपणानं तुम्हाला सांगण्याचा अनेक दिवसांपासून विचार करत होते. या परिस्थितिचा सामना करताना मी अडखळले, हे प्रामाणिकपणे सांगते. मला चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. अखेर मी आज माझं मन मोकळे करते. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल किंवा तुम्ही बुचकळ्यात पडाल, परंतु ही पोस्ट संपेपर्यंत मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळेल. आशा करते की तुम्ही मला पाठिंबा द्याल,''असे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूनं म्हटलं.
''कोरोनाच्या या संकटानं माझे डोळे उघडले. मला सराव करता आला नाही. कोर्टवरील प्रतिस्पर्धीला मी पराभूत करू शकते, परंतु या न दिसणाऱ्या शत्रूचा कसा सामना करू? अनेक महिने मी घरीच आहे आणि घराबाहेर पडायचं का, हा प्रश्न अजूनही आपण स्वतःला विचारतोय. या काळात आपण काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अनेक बातम्याही वाचल्या. मलाही डेन्मार्क ओपनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता आले नाही,''असे सिंधू म्हणाली.
तिनं पुढे लिहिले की,''आज मी या सर्व संकटातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. मी नकारात्मकतेतून, सततच्या भीतीपासून निवृत्त होतेय.'' आशिया ओपन स्पर्धेत मी कोर्टात उतरणार आहे आणि त्यासाठी कसून सराव करण्यास सुरुवात करत आहे, असे तिनं म्हटले आहे.