नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीचे होणार विश्लेषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 08:36 AM2021-08-13T08:36:54+5:302021-08-13T08:37:18+5:30
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताच्या पदरी सर्वाधिक निराशा आली आहे. ज्या खेळामध्ये भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती, त्या नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठण्यातही भारतीयांना संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आता भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणी तीन भागात समीक्षा होणार असून, यास याआधीच सुरुवात झाल्याची माहिती एनआरएआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. रिओ ऑलिम्पिक (२०१६) स्पर्धेत नेमबाजांच्या पदकांची झोळी रिकामी राहिल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमधूनही भारतीय नेमबाज रिकाम्या हाताने परतले. विशेष म्हणजे ऑलिम्पिकआधी झालेल्या विविध विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीयांनी पदकांची लयलूट करत सर्वांना इशारा दिला होता. मात्र, ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना विश्वचषक स्पर्धेतील लय मिळवता आली नाही.
एनआरएआयच्या सूत्राने सांगितले की, ‘नेमबाजांच्या कामगिरीचे विश्लेषण सुरू झाले आहे. सर्वांत आधी खेळाडू, नंतर प्रशिक्षक व सहयोगी स्टाफ आणि त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामगिरीची चौकशी होईल.’ एनआरएआय अध्यक्ष रनिंदर सिंग यांच्याही कामगिरीचे विश्लेषण होणार असल्याचे संकेतही सूत्राने यावेळी दिले.