आनंदने जगज्जेत्या कार्लसनला हरवले
By Admin | Published: June 21, 2015 01:08 AM2015-06-21T01:08:30+5:302015-06-21T01:08:30+5:30
पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद येथे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गत जगज्जेता कार्लसनला पराभूत करीत
स्टेवेनगर (नॉर्वे) : पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद येथे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत गत जगज्जेता कार्लसनला पराभूत करीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
पहिल्या तीन फेऱ्यांत बाजी ड्रॉ सोडवल्यानंतर आनंदने कार्लसनला खेळाच्या सर्वच विभागांत पिछाडीवर टाकताना पराभूत केले. त्यामुळे त्याचे ४ पैकी २.५ गुण झाले आहेत.
बुल्गारियाच्या व्हेसेलिन टोपोलोव्हने आर्मेनियाच्या लेवोन अरोनियन याचा पराभव करताना चार फेऱ्यांत तिसरा विजय नोंदवताना आघाडी घेतली आहे. रशियाच्या अलेक्झांडर गिश्चुक याने स्थानिक खेळाडू जॉन लुडविग हॅमरला पराभव करीत पहिल्या विजयाची नोंद केली.
चौथ्या फेरीत अन्य लढती बरोबरीत सुटल्या. नेदरलँडच्या अनिष गिरीने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराबरोबरची लढत बरोबरीत सोडवली, तर इटलीच्या फाबियानो कारुआना याला फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवने बरोबरीत रोखले.
या ३०५००० डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील अद्याप पाच फेऱ्या बाकी आहेत. विद्यमान स्थितीत टोपोलोव्ह ३.५ गुणांसह अव्वल स्थानी आहे. नाकामुरा त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पिछाडीवर आहे. आनंद आणि गिरी २.५ गुणांसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहे. कारुआना ग्रिश्चुक आणि मॅक्सिम दोन गुणांसह पाचव्या स्थानी, तर आरोनियन आणि हॅमर एका गुणासह संयुक्तरीत्या आठव्या क्रमांकावर आहे. (वृत्तसंस्था)