आनंद गंगवाल आयर्नमॅन शर्यतीत यशस्वी
By admin | Published: June 28, 2016 09:07 PM2016-06-28T21:07:21+5:302016-06-28T21:07:21+5:30
फिजिओथेरपी, क्रीडावैद्यकशास्त्र क्षेत्रातील पुण्यातील डॉ. आनंद गंगवाल याने आॅस्ट्रियामधील आव्हानात्मक आणि खडतर शर्यती रविवारी पूर्ण करून आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
आॅस्ट्रियामधील स्पर्धा : १६ तास ३१ मिनिटे २९ सेकंदांत केली पूर्ण
पुणे : फिजिओथेरपी, क्रीडावैद्यकशास्त्र क्षेत्रातील पुण्यातील डॉ. आनंद गंगवाल याने आॅस्ट्रियामधील आव्हानात्मक आणि खडतर शर्यती रविवारी पूर्ण करून आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
पाच वर्षांच्या अथक आणि योजनाबद्ध सरावानंतर वयाच्या ३६ व्या वर्षी आनंदने ही शर्यत जिंकली. त्याने ही कामगिरी तिसऱ्या प्रयत्नात संपादन केली. पोहणे, सायकलिंग आणि मॅरेथॉन धावणे अशा तीन क्रीडाप्रकारांचा आयर्नमॅन शर्यतीत समावेश असतो. त्यासाठी निर्धारित कमाल वेळ (कट आॅफ टाइम) संयोजकांनी नक्की केलेली असते. आॅस्ट्रियातील शर्यतीसाठी ही वेळ १७ तासांची होती. आनंदने १६ तास ३१ मिनिटे २९ सेकंद इतक्या वेळेत ही शर्यत पूर्ण केली.
आनंदने या शर्यतीसाठी सायकलपटू विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जलतरणपटू चैत्राली पावणस्कर हिच्या साथीत सराव केला. आनंदने दक्षिण आॅस्ट्रेलिया विद्यापीठातून फिजिओथेरपीचे उच्च शिक्षण घेतले. तो पुणे विद्यापीठात मास्टर आॅफ फिजिओथेरपी कोर्ससाठी सहयोगी व्याख्याता आहे.
आनंदची कामगिरी :
पोहणे - १ तास ३५ मिनिटे ७ सेकंद
सायकलिंग - ७ तास ५९ मिनिटे ४१ सेकंद
धावणे : ६ तास ३७ मिनिटे ५४ सेकंद
एकूण : १६ तास ३१ मिनिटे २९ सेकंद